ऑनलाइन लोकमत
मुंबई, दि. २९ - रिझर्व बँकेने मंगळवारी रेपो रेटमध्ये अर्धा टक्क्यांची कपात करत ग्राहकांना मोठा दिलासा दिला आहे. रेपो रेटमध्ये कपात झाल्याने गृह व वाहन कर्जावरील व्याजदरात कपात होण्याची शक्यता आहे.
रिझर्व बँकेने चालू आर्थिक वर्षातील चौथे पतधोरण मंगळवारी जाहीर केले. अर्थव्यवस्थेला प्रोत्साहन देण्यासाठी रेपो रेटमध्ये कपात करण्याची मागणी जोर धरत होती. केंद्र सरकारनेही रेपो रेटमध्ये कपात करण्याची गरज व्यक्त केली होती. या पार्श्वभूमीवर रघुराम राजन यांनी मंगळवारी जाहीर केलेल्या पतधोरणात रेपो रेटमध्ये अर्धा टक्क्यांची कपात केली आहे. त्यामुळे रेपो रेट आता ६.७५ टक्क्यांवर आला आहे. रिव्हर्स रेपो रेटही ६.२५ टक्क्यांवरुन ५.७५ टक्क्यांवर आला आहे. कॅश रिझर्व रेशिओ ४ टक्क्यांवर कायम ठेवण्यात आला आहे.
गेल्या चार वर्षांत रेपो रेटचा हा नीचांक आहे. रेपो रेटमध्ये कपात झाल्याने कर्ज स्वस्त होण्याची आशा व्यक्त होत आहे. यामुळे बाजारातील मंदीचे ढग आता बाजूला सरतील अशी शक्यता आहे.