भाषणादरम्यान निर्देशांकाची घसरण
बजेटच्या दिवशी
चार वर्षांत प्रथमच वाढ
अच्छे दिनच्या अपेक्षेत असलेल्या नागरिकांना अर्थमंत्र्यांकडून मोठ्या अपेक्षा असल्याने शनिवारी बाजार सुरू झाला तोच सुमारे २५० अंशांनी वाढून. त्यानंतर अर्थसंकल्पाचे वाचन सुरू असताना काहीच पदरात पडत नसल्याची भावना निर्माण होऊन निर्देशांकाने गटांगळी खाल्ली. त्यानंतर मात्र अर्थसंकल्पाबाबत चांगले मत झाल्याने बाजाराने पुन्हा उसळी घेतली आणि अखेरीस १४१ अंशांंनी वाढून हा निर्देशांक स्थिरावला. ही आहे अर्थसंकल्पाच्या दिवशीची शेअर बाजाराची स्थिती.
अर्थमंत्री अरुण जेटली यांनी सादर केलेल्या पहिल्याच पूर्ण अर्थसंकल्पाकडून बाजाराच्या मोठ्या अपेक्षा होत्या. प्राप्तिकरामध्ये सूट मिळेल तसेच बाजाराला चालना मिळणाऱ्या काही घोषणा होण्याच्या अपेक्षेने शनिवार बाजाराच्या विशेष सत्राला प्रारंभ झाला तो निर्देशांकाने सुमारे २५० अंशांची उसळी घेऊनच. बरोबर ११ वाजता अर्थमंत्री जेटली अर्थसंकल्प सादर करण्यास उभे राहिले आणि बाजार सावध झाला.अर्थमंत्र्यांच्या वाचनात फारसे काही हाती लागत नसल्याचे दिसताच बाजारात निराशा आली आणि आधीची तेजी पार वाहून गेली. बाजार चक्क गडगडला.
जसजसा काळ जात राहिला बाजारावरील निराशेचे मळभ गडद होत चालले. मात्र कंपनी करामध्ये कपात आणि ‘गार’ आणि जीएसटीच्या अंमलबजावणीबाबत अर्थमंत्र्यांनी केलेल्या घोषणांमुळे बाजारात पुन्हा जान आणली असेच म्हणावे लागेल. बाजारात सुरू झालेली वाढ ही दिवसअखेर कायम राहिली. दिवसअखेरीस संवेदनशील निर्देशांक १४१.३८ अंशांनी वाढून २९३६१.५० अंशांवर बंद झाला. दिवसभरात संवेदनशील निर्देशांकाने ७०० अंशांत हेलकावे खाल्ले.
गेल्या तीन वर्षांच्या अर्थसंकल्पांनंतर बाजाराच्या निर्देशांकांमध्ये घसरण झालेली दिसून आली. यंदा मात्र ही परंपरा मोडीत काढत निर्देशांकाने चांगलीच घोडदौड केलेली दिसून आली. काही काळ बाजारात इतिहासाची पुनरावृत्ती होण्याची स्थिती होती.
कंपनी करामधील बदल
कंपनी करातील कपातीमुळे भारतातील गुंतवणुकीचा वेग वाढण्याची अपेक्षा आहे. करकपातीमुळे उद्योगांच्या विकासाला हातभार लागणार आहे. त्याचबरोबर तरुणांसाठी अधिक रोजगार निर्माण होणार असल्याचेही अर्थमंत्री अरुण जेटली यांनी आपल्या भाषणामध्ये स्पष्ट केले आहे. कंपनी करामध्ये कपात केल्यानंतर देण्यात आलेल्या विविध सवलती टप्प्याटप्प्याने कमी करण्याचा मानस असल्याचे अर्थमंत्र्यांनी जाहीर केले आहे.
निफ्टी ८९०० पार : राष्ट्रीय शेअर बाजाराच्या निर्देशांकाने (निफ्टी) ८९०० अंशांची पातळी ओलांडली. शनिवारी बाजार बंद होताना तो ८९०१.८५ अंशांवर बंद झाला. गतदिवसाच्या बंद निर्देशांकाच्या तुलनेमध्ये त्यात ५७.२५ अंशांनी वाढ झाली. दिवसभरात या निर्देशांकामध्येही बरीच उलथापालथ झाली.
येत्या चार वर्षांमध्ये कंपनी करामध्ये ५ टक्क्यांनी कपात करण्याची अर्थमंत्र्यांची घोषणा बाजारासाठी महत्त्वाची ठरली. याशिवाय ‘गार’ची अंमलबजावणी पुढे ढकलणे आणि सरकारने जाहीर केलेला विकासाचा आराखडा बाजाराला भावणारा ठरला.
भारतीय अर्थव्यवस्था जागतिक दर्जाची बनविण्याकडे वाटचाल करण्याचा प्रयत्न या अर्थसंकल्पाने केला आहे. ‘गार’ची अंमलबजावणी पुढे ढकलणे तसेच दिवाळखोरीसाठीचा नवीन कायदा करणे या बाबी बाजारासाठी चांगल्या आहेत. कंपनी करावरील २ टक्क्यांचा अधिभार हा बाजारासाठी काळजीचा ठरणार आहे. - दिनेश ठक्कर, अध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक, अॅँजल ब्रोकिंग
व्यावसायिक वाहनांवरील टेरीफ रेट १० टक्क्यांवरून ४० टक्क्यांवर नेल्याने ट्रकद्वारा होणाऱ्या मालवाहतुकीवर विपरीत परिणाम होणार आहे. रेल्वेच्या मालवाहतूक दरामध्ये वाढ झाल्याने ट्रक व्यावसायिकांना मिळालेला दिलासा अर्थमंत्र्यांनी काढून घेतला आहे.
- अनुप बागची, आयसीआयसीआय सिक्युरिटीज्
अर्थसंकल्पाकडून मोठ्या अपेक्षांसह वाढीव पातळीवर सुरू झालेला बाजार अर्थसंकल्प सुरू असताना एकदम घसरला; मात्र त्यानंतर विविध कंपन्यांना मिळणाऱ्या सवलतींची माहिती मिळताच बाजार १४१ अंशांनी वाढून बंद झाला.
सुमारे एका दशकानंतर सरकारने कंपनी करामध्ये कपात करण्याचा निर्णय जाहीर केला आहे. ३० टक्क्यांवर असलेला हा कर आगामी चार वर्षांमध्ये पाच टक्क्यांनी कमी करून २५ टक्के करण्याची अर्थमंत्री जेटली यांची घोषणा कंपनी जगताला निश्चितच सुखावून गेली.
आशियातील अन्य देशांच्या मानाने भारतामधील कंपन्यांवर आकारला जाणारा ३० टक्के कर कमी करण्याची मागणी कधीची होत होती. आंतरराष्ट्रीय पातळीवरील स्पर्धेत टिकण्यासाठी हा कर कमी करणे गरजेचे असल्याचे वारंवार सांगितले जात होते. त्यानुसार अर्थमंत्र्यांनी निर्णय घेतला आहे.
देशातील कंपनी कराच्या वसुलीचे प्रमाण केवळ २३ टक्के आहे. एका बाजूला कराचा दर अधिक असल्याची ओरड असतानाच देण्यात आलेल्या अनेक सवलतींमुळे वसुलीचे प्रमाण कमी असल्याचे सांगण्यात आले.
लोकसभेत अर्थसंकल्प मांडला जाणार असल्यामुळे बाजार मोठ्या अपेक्षेने सुरू झाला खरा; पण अर्थसंकल्प वाचण्यास प्रारंभ केला आणि बाजारात प्रतिक्रिया सुरू झाली.
अर्थमंत्र्यांकडून २०-ट्वेंटीच्या सामन्याची अपेक्षा असताना त्यांनी कसोटीसारखा पाच वर्षांनी फळे देणारा अर्थसंकल्प सादर केल्याने बाजार झपाट्याने खाली आला. त्यामुळे सुरुवातीची वाढ वाहून गेली.
कालांतराने बाजाराला अर्थसंकल्पामधील विविध चांगल्या तरतुदींची जाणीव झाली. यामुळे बाजार पुन्हा चढू लागला. दिवस अखेरीस सेन्सेक्स १४१.३८ अंशांनी वाढून २९३६१.५० अंशांवर बंद
झाला.