नम्रता फडणीस,
पुणे- कर्करोग रुग्णांना उपचार मिळणे आणखी सुलभ व्हावे, यासाठी आता पुण्यात शासकीय कर्करोग रूग्णालय उभारले जाणार आहे. त्यासाठी जागेची पहाणी झाली असून लवकरच जागा निश्चित केली जाईल, अशी माहिती आरोग्य विभागातील सूत्रांनी दिली.
ससून सर्वोपचार रूग्णालयाने कर्करोग रूग्णालयाच्या उभारणीसाठी पुढाकार घेतला असून, यासंबंधीचा प्रस्ताव एक वर्षांपूर्वी शासनदप्तरी दाखल केला आहे. जुनी जिल्हा परिषदेची इमारत आणि ससून रुग्णालयाच्या मधोमध असलेला भूखंड यासाठी निश्चित करण्यासंबंधी चर्चा सुरू आहे. हा सव्वा दोन एकरचा भूखंड एमएसआरडीसीचा आहे, त्यांच्याशी जागेसंबंधी बोलणी सुरू आहेत. या भूखंडाच्या बदल्यात ससूनची येरवडा येथील मेंटल हेल्थ इन्स्टिट्यूटची जागा एमएसआरडीसीला देण्यात येणार आहे.
शासकीय कर्करोग रूग्णालयासाठी जागा निश्चित करण्याची प्रक्रिया अंतिम टप्प्यात आहे. हे रूग्णालय लवकरात लवकर आकाराला येण्यासाठी शासनदरबारी पाठपुरावा करणार आहे.
- डॉ. अजय चंदनवाले, अधिष्ठाता, बी. जे. मेडिकल महाविद्यालय