ऑनलाइन लोकमत
नवी दिल्ली, दि. २२ - कर्मचारी भविष्य निर्वाह निधी संस्थेचा प्रस्ताव अर्थखात्याने स्वीकारला तर भारतातल्या पाच कोटी कर्मचा-यांना भविष्य निर्वाह निधीवर ८.९५ टक्के व्याज मिळण्याची शक्यता आहे. सध्या हा व्याजदर ८.७५ टक्के आहे. याचा अर्थ दर लाखाला २०० रुपये व्याज जास्त मिळेल. म्हणजे जर का तुमची भविष्य निर्वाह निधीतील पुंजी १० लाख असेल तर तुम्हाला वर्षाला २००० रुपये जास्त व्याज मिळेल.
सदर प्रस्ताव केंद्रीय विश्वस्त मंडळाने मान्य केल्यावर त्यावर अर्थखात्याची मोहोर उमटावी लागेल. टाइम्स ऑफ इंडियाने दिलेल्या वृत्तानुसार २०१० - ११ या काळात दिलेल्या ९.५ टक्क्याच्या व्याजदरानंतरचा हा सर्वाधिक व्याजदर प्रॉव्हिडंट फंडावर असेल.
केंद्रीय अर्थमंत्री अरूण जेटली व कामगार मंत्री बंडारू दत्तात्रेय यांनी हा प्रस्ताव मान्य केला तर त्याचा लाभ पाच कोटी EPF धारकांना होणार आहे.
विशेष म्हणजे बँकांच्या ठेवींवरील व्याजदर घटण्याचे संकेत मिळत असताना भविष्य निर्वाह निधीवरील व्याजदर वाढले तर त्याकडे जाणारा पैशाचा ओघही वाढण्याची शक्यता आहे. मध्यमवर्गीय कर्मचा-यांची भविष्य निर्वाह निधीतील गुंतवणुकीवर असलेली मदार लक्षात घेता, अर्थखाते या वर्गाला खुश खरेल असा अंदाज आहे. याआधीही काहीवेळा अर्थखात्याने सेंट्रल बोर्डाच्या विश्वस्तांच्या प्रस्तावावर खळखळ केली होती, परंतु त्यांचे प्रस्ताव स्वीकारले होते, यावेळीही तसेच होईल अशी अपेक्षा आहे. यासंदर्भात, कामगार मंत्री बंडारू दत्तात्रेय यांच्याशी भविष्य निर्वाह निधी संस्थेचे सदस्य चर्चा करतील असे समजते.