नवी दिल्ली : सोन्याच्या दरातील येथील बाजारपेठेतील घसरण सोमवारी सलग तिसऱ्या दिवशीही कायम राहून ते १२० रुपयांनी स्वस्त झाले. या घसरणीनंतर त्याचा १० ग्रॅमचा भाव २६,८५० रुपये होता. जागतिक बाजारपेठेतही सोन्याच्या भावात चमक नाही, कारण गेल्या आठ महिन्यांतील सर्वात स्वस्त असा त्याचा भाव होता.
सध्याच्या पितृपंधरवड्यामुळे सराफांकडून सोन्याला मागणी नाही, कारण या पंधरवड्यात सोने खरेदी शुभ समजली जात नाही. शिवाय चढत्या इक्विटी मार्केटमध्ये गुंतवणूक केली जात असल्यामुळे सोन्याच्या भाववाढीला अटकाव झाला, असे व्यापाऱ्यांनी सांगितले. चांदीच्या भावातीलही घसरण सलग पाचव्या दिवशी, म्हणजे सोमवारी कायम राहिली व ती ३७५ रुपयांनी घटून किलोला ३९,२५० रुपयांपर्यंत पोहोचली.
चांदीला उद्योगांकडून व नाणे बाजारातून मागणी नसल्यामुळे ही घसरण झाली. सिंगापूरमध्ये सोन्याचा जो भाव असतो त्या आधारे सामान्यत: येथील सोन्याचा भाव निश्चित होतो. हा भाव ०.६० टक्क्यांनी घटून १,२०८.४० अमेरिकन डॉलर झाला. चांदीही ०.३ टक्क्यांनी उतरून १७.७८ अमेरिकन डॉलरवर आली. चांदीचा हा भाव आॅगस्ट २०१० नंतरचा सर्वात कमी आहे. दिल्लीमध्ये ९९.९ आणि ९९.५ टक्के शुद्धतेच्या सोन्याच्या भावात १० ग्रॅममागे प्रत्येकी १२० रुपये घट होऊन ते अनुक्रमे २६,८५० व २६,६५० रुपये झाला. गेल्या दोन सत्रांत सोने ४८० रुपयांनी स्वस्त झाले आहे.
आठ ग्रॅमचे सुवर्ण नाणे २४,२०० रुपयांवर स्थिर राहिले. चांदीच्या १०० नाण्यांची खरेदी मात्र एक हजारांनी महाग होऊन ६९ हजार, तर विक्री ७० हजार रुपयांवर गेली. (लोकमत न्यूज नेटवर्क)
सोने १२० रुपयांनी घसरले
सोन्याच्या दरातील येथील बाजारपेठेतील घसरण सोमवारी सलग तिसऱ्या दिवशीही कायम राहून ते १२० रुपयांनी स्वस्त झाले.
By admin | Updated: September 22, 2014 22:57 IST2014-09-22T22:57:48+5:302014-09-22T22:57:48+5:30
सोन्याच्या दरातील येथील बाजारपेठेतील घसरण सोमवारी सलग तिसऱ्या दिवशीही कायम राहून ते १२० रुपयांनी स्वस्त झाले.
