नवी दिल्ली : उत्पादन, सेवा आणि खाण क्षेत्राने चांगली कामगिरी नोंदवल्याने भारतीय अर्थ व्यवस्था पुन्हा वेगाने विकासाकडे वाटचाल करताना दिसत आहे. एप्रिल ते जून या पहिल्या तिमाहीत अर्थव्यवस्थेने ५.७ टक्के असा विकास दर गाठला असून हा अडीच वर्षातील उच्चांक आहे.
मध्यवर्ती सांख्यिकी कार्यालयाने जाहीर केलेल्या आकडेवारीनुसार भारतीय अर्थव्यवस्था वेगाने विकसित होत असल्याचे समोर आले आहे. मागील वर्षीच्या पहिल्या तिमाहीतील एकूण देशांतर्गत उत्पादनापेक्षा यावर्षीच्या पहिल्या तिमाहीत ४.७ टक्के अधिक उत्पादन झाले आहे. मागील वर्षाच्या पहिल्या तिमाहीत आधीच्या वर्षापेक्षा एकूण देशांतर्गत उत्पादनामध्ये १.२ टक्यांनी घट झाली होती.
आजच्या आकडेवारीनुसार देशाच्या उत्पादन क्षेत्राने ३.५ टक्के वाढ दर्शविली आहे. खाण क्षेत्राने या तिमाहीत २.१ टक्के वाढ नोंदविली आहे. तिमाहीमध्ये आर्थिक सेवा क्षेत्राने १०.४ टक्के अशी सर्वोच्च वाढ नोंदविली आहे. त्यापाठोपाठ ऊर्जा , गॅस आणि पाणीपुरवठा विभागाने १०.२ टक्के अशी वाढ नोंदविली आहे.
बांधकाम क्षेत्रात ४.८ टक्के अशी वाढ झाली आहे. मागील वर्षी याच क्षेत्राने १ .१ टक्के वाढ नोेंदविली होती. व्यापार, हॉटेल, वाहतूक आणि दळणवळण या क्षेत्रामधील वाढीनेही १.६ टक्क्यांवरून ४.८ टक्क्यांवर झेप घेतली आहे.
कृषी क्षेत्र तसेच कृषी वनक्षेत्र आणि मत्स्योद्योग या क्षेत्राने मागील वर्षापेक्षा काहीशी घट नोंदविली आहे. मागील वर्षी या क्षेत्राचा विकासदर ४ टक्के होता. तो आता ३.८ टक्क्यांवर आला आहे. (लोकमत न्यूज नेटवर्क)
पहिल्या तिमाहीत जीडीपी ५.७ टक्के
उत्पादन, सेवा आणि खाण क्षेत्राने चांगली कामगिरी नोंदवल्याने भारतीय अर्थ व्यवस्था पुन्हा वेगाने विकासाकडे वाटचाल करताना दिसत आहे
By admin | Updated: August 30, 2014 03:38 IST2014-08-30T03:38:38+5:302014-08-30T03:38:38+5:30
उत्पादन, सेवा आणि खाण क्षेत्राने चांगली कामगिरी नोंदवल्याने भारतीय अर्थ व्यवस्था पुन्हा वेगाने विकासाकडे वाटचाल करताना दिसत आहे
