प्रवीण देसाई , कोल्हापूर
गॅस सिलिंडर मोबाईलवरून बुकिंग करताना आता सबसिडी नाकारण्यासाठी ‘शून्य’ व पाहिजे असल्यास ‘एक’ असे नवीन दोन सुधारित पर्याय समाविष्ट करण्यात आले आहेत. ते निवडताना चुकून आकड्यांची अदलाबदल झाल्यास सबसिडी बुडण्याची भीती निर्माण झाली आहे. ग्रामीण भागातील अनेक ग्राहकांना त्याचा फटका बसला आहे. ही तांत्रिक चूक झाल्यास त्याचे पुढील निराकरण कसे करायचे, याचे उत्तर गॅस वितरकांकडेही नाही. सध्या ही योजना इंडेन कंपनीकडून सुरू झाली असली तरी ‘एचपीसी’ व ‘बीपीसी’ कंपन्यांकडेही ती लवकरच सुरू होण्याची शक्यता आहे. सबसिडीच्या या पार्श्वभूमीवर जिल्ह्यातील जवळपास दहा तक्रारी ग्राहक पंचायत संघटनेकडे आल्या आहेत.
गेल्या वर्षभरापासून मोबाईलवरून गॅस बुकिंगची नोंदणीहोत आहे. गॅस कंपनीच्या दिलेल्या क्रमांकावर ग्राहकांनी आपल्या विक्रेत्याकडे जो मोबाईल नंबर रजिस्टर केला आहे त्याद्वारे कॉल केल्यास गॅस बुकिंग होतो. ग्राहकांना घरबसल्या ही सुविधा कंपन्यांनी जरी उपलब्ध करून दिली असली तरी ती सध्या मोठी डोकेदुखी झाल्याचे दिसते. कारण जुलै महिन्याच्या सुरुवातीपासून मोबाईलवरून गॅस बुक करताना गॅसची सबसिडी नको असेल तर ‘शून्य’ व पाहिजे असल्यास ‘एक’ बटण दाबण्याची सूचना येते. त्यामध्ये चुकून ‘शून्य’ बटण दाबल्यास सर्वसामान्यांना मिळणारी सबसिडी बंद होण्याची शक्यता आहे. त्याचा फटका शाहूवाडी व चंदगड तालुक्यातील इंडेन गॅस कंपनीच्या ग्राहकांना बसला आहे. सबसिडी बुडण्याच्या भीतीने ग्राहकांमध्ये खळबळ उडाली आहे. सद्य:स्थितीला विशेषत: ग्रामीण भागात या अडचणी जाणवत आहेत. ग्रामीण भागातील सर्वच ग्राहक सुशिक्षित असतील असेही नाही. त्यामुळे चुकून ‘शून्य’ बटण दाबले गेल्याने ग्राहकांना नाहक मन:स्ताप होत आहे.
याबाबत पुढे काय करायची यासंबंधीची विचारणा करायला गेल्यावर गॅस विक्रेत्यांजवळही त्याचे उत्तर नाही. कारण ही तांत्रिक सुधारणा थेट कंपनीकडूनच झाली असल्याने विक्रेत्यांनाही त्यात काही हस्तक्षेप करता येत नाही.
बुकिंग करताना बुडू शकते गॅस सबसिडी
गॅस सिलिंडर मोबाईलवरून बुकिंग करताना आता सबसिडी नाकारण्यासाठी ‘शून्य’ व पाहिजे असल्यास ‘एक’ असे नवीन दोन सुधारित पर्याय समाविष्ट करण्यात आले आहेत
By admin | Updated: July 19, 2015 23:22 IST2015-07-19T23:22:35+5:302015-07-19T23:22:35+5:30
गॅस सिलिंडर मोबाईलवरून बुकिंग करताना आता सबसिडी नाकारण्यासाठी ‘शून्य’ व पाहिजे असल्यास ‘एक’ असे नवीन दोन सुधारित पर्याय समाविष्ट करण्यात आले आहेत
