Lokmat Money > बिझनेस न्यूज > गणपती आले गावाला, चैन पडेना आम्हाला..

गणपती आले गावाला, चैन पडेना आम्हाला..

कोकणातले कामगार गावाकडे : औद्योगिक वसाहती, आस्थापने सुनीसुनी

By admin | Updated: August 28, 2014 21:12 IST2014-08-28T21:12:26+5:302014-08-28T21:12:26+5:30

कोकणातले कामगार गावाकडे : औद्योगिक वसाहती, आस्थापने सुनीसुनी

Ganapati came gaavala, Chan Padena us .. | गणपती आले गावाला, चैन पडेना आम्हाला..

गणपती आले गावाला, चैन पडेना आम्हाला..

कणातले कामगार गावाकडे : औद्योगिक वसाहती, आस्थापने सुनीसुनी
पणजी : कोकणातला गणेशोत्सव आणि मुंबईचा चाकरमानी हे समीकरण आता बदलले आहे. मुंबईबरोबरच गोव्यातही मोठय़ा प्रमाणात कोकणातील युवक नोकरी-व्यवसायानिमित्त वास्तव्यास असल्याने चतुर्थीसाठी ‘मोमयकारां’बरोबरच ‘गोंयकार’ चाकरमानीही गावाच्या ओढीने काही दिवस गोव्याला ‘टाटा’ करतात.
इथल्या औद्योगिक वसाहतींमध्ये सिंधुदुर्ग, रत्नागिरीचा कामगारवर्ग मोठय़ा प्रमाणावर आहे. काही वर्षांपूर्वी हॉटेल कामगार कोकणातीलच असायचे; पण त्यांची जागा दक्षिण व उत्तर भारतीय कामगार घेत आहेत; कारण हा कोकणी कामगार औद्योगिक वसाहतींमधल्या कंपन्यांकडे ओढला गेला आहे. शिक्षित युवक-युवती अनेक आस्थापनांत, तारांकित हॉटेल्समध्ये कामाला आहेत. सणासुदीला गावाला जायचे, हा नेहमीचा शिरस्ता हे कामगार चतुर्थीला न पाळतील, तरच नवल. त्यामुळे चतुर्थीच्या आधी काही दिवस; प्रसंगी कामाला दांडी मारून ते गावाला निघून जातात. पुन्हा परततात ते चतुर्थीतल्या भारावलेल्या आनंदमय वातावरणाची शिदोरी घेऊनच!
घराघरांत गणपती ही कोकणी मुलखाची खरी ओळख. चतुर्थीत सत्यनारायण महापूजाही मोठय़ा प्रमाणावर होतात. आरती, भजने, भजनी बुवांचे डबलबारी सामने, गायन मैफली अहोरात्र सुरूच असतात. बांदा, दोडामार्गमध्ये गोव्याच्या घुमट आरतीचे मोठे आकर्षण आहे. त्यामुळे अनेकांनी ही कला आत्मसात केली आहे. काहीजण थेट इथल्या घुमट आरती मंडळांनाच आमंत्रित करतात. मात्र, एकेकाळी गणेशोत्सवाचे अविभाज्य अंग असलेली फुगडी कला मात्र येथे अभावानेच दिसून येते.
कोकणात गणेशोत्सव हा ‘जनरेशन गॅप’ भरून काढणारा उत्सव ठरतो. हौसा, गौरी पूजन आदी परंपरांचे नव्या पिढीकडून आग्रहाने पालन करून घेतले जाते. विखुरलेले परिवार एकत्र येतात. मित्र, पाहुण्यांच्या वर्दळीत दिवस आणि रात्रीही उसंत मिळत नाही. या पाच-सात दिवसांतला उत्साहाने भारलेला प्रत्येक क्षण उरात साठवला जातो. गणपती येतो तो असा ‘मंगलमूर्ती’ बनून.!

........कोट........

चतुर्थीच्या तयारीसाठी आधी दोन-तीन दिवस रजा टाकून गावी जातो. पुढचे पाच-सात दिवस क्षणाचीही उसंत नसते. मात्र, गरज भासली, तर एखाद-दुसर्‍या दिवशी कामावर जातो. गोव्यात कामाला असण्याचा फायदा म्हणजे अवघ्या काही तासांत ये-जा करणे शक्य होते.
- स्वप्नील सावंत, रत्नागिरी.

गोव्यात अनेक नातेवाईक असल्याने चतुर्थीत गावाकडे गेलो, तरी एखादी फेरी गोव्यात होतेच. कोकणातल्या युवकांना नोकरीसाठी मुंबईपेक्षा गोवा सोयीस्कर आहे. सणासुदीला, आपत्कालीन प्रसंगी गावाकडे सहजपणे कमी वेळात पोहोचता येते.
- शिरीष वेटे, घोटगेवाडी-दोडामार्ग.

Web Title: Ganapati came gaavala, Chan Padena us ..

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.