नवी दिल्ली : कारच्या विक्रीत प्रमुख कंपन्यांना गेल्या मार्च महिन्यात घट सोसावी लागली. केवळ अशोक लेलँड कंपनीच्या विक्रीत तब्बल २४ टक्क्यांची वाढ झाली. दुचाकी वाहन उद्योगाला मात्र हा महिना लाभदायक ठरला. रॉयल एन्फिल्डने प्रचंड अशी ४२ टक्क्यांची वाढ मिळविली, तर शेतीची उपकरणे बनविणाऱ्या एस्कॉर्ट कंपनीला ३१ टक्क्यांची घट सोसावी लागली. सर्वात मोठी कार उत्पादक कंपनी असलेल्या मारुती सुझुकीची विक्री १.६ टक्क्यांनी घटली आहे.
ह्युंदाई मोटार इंडियाची एकूण विक्री मार्च महिन्यात ३.८ टक्क्यांनी घटून ४९,७४० वाहनांची झाली. मार्च २०१४ मध्ये ५१,७०८ वाहनांची विक्री झाली होती. भारतातील बाजारपेठेत कंपनीची विक्री १२.९ टक्क्यांनी वाढून ३९,५२५ वाहने झाली. मार्च २०१४ मध्ये ही संख्या ३५,००३ होती. गेल्या मार्चमध्ये कंपनीची निर्यात ३८.९ टक्क्यांनी कमी होऊन १०,२१५ वाहनांची झाली. हीच निर्यात मार्च २०१४ मध्ये १६,७०५ झाली होती.
हिंदुजा समूहाची प्रमुख कंपनी अशोक लेलँडने गेल्या मार्च महिन्यात १२,७५४ वाहने विकली. ही विक्री गेल्यावर्षीच्या मार्चमधील विक्रीच्या २४ टक्के जास्त आहे. गेल्या मार्चमध्ये जड आणि मध्यम आकाराच्या व्यावसायिक वाहनांच्या विक्रीत १९.९१ टक्के वाढ होऊन ती १०,०२७ झाली. गेल्या वर्षी मार्चमध्ये ही विक्री ७,७१८ होती. मार्चमध्ये कंपनीच्या हलक्या वाहनांच्या विक्रीत ६.३९ टक्के वाढ होऊन ती २,७२७ (मार्च २०१४ मध्ये २,५६३) झाली.
जनरल मोटार्स इंडियाच्या विक्रीत मार्च २०१५ मध्ये तब्बल ३५.५ टक्के घट झाली. कंपनीने ४,२५७ कार विकल्या. गेल्यावर्षी मार्चमध्ये ६,६०१ कार विकल्या गेल्या होत्या.
महिंद्रा अँड महिंद्रा कंपनीने मार्चमध्ये एकूण ४५,२१२ वाहने विकली असली तरी गेल्यावर्षी याच महिन्यातील विक्रीपेक्षा (५१,६३६) ती १२.४४ टक्क्यांनी कमी आहे. मार्चमध्ये देशांतर्गत बाजारपेठेत कंपनीने ४१,१९३ वाहने विकली. मार्च २०१५ मध्ये कंपनीच्या वाहनांची निर्यात २८ टक्क्यांनी वाढून ४,०१९ वाहनांची झाली. मार्चमध्ये कंपनीच्या प्रवासी वाहनांच्या विक्रीत १०.२५ टक्क्यांची घट होऊन ती २१,०३० विकली गेली.
रॉयल एन्फिल्डच्या दुचाकी वाहनांच्या विक्रीत मार्चमध्ये तब्बल ४२ टक्क्यांची वाढ होऊन ती ३३,६७९ झाली. होंडा मोटारसायकल अँड स्कूटर इंडियाची मार्चमधील एकूण विक्री १.८१ टक्क्यांनी वाढून ३,९९,१७८ वाहनांची झाली. दुचाकी वाहनांच्या उत्पादनातील देशातील सगळ्या मोठी कंपनी हीरो मोटोकॉर्पच्या विक्रीत मार्चमध्ये १.४७ टक्क्यांची वाढ होऊन ती ५,३१,७५० वाहने झाली. कृषी उपकरणांचे उत्पादन करणारी एस्कॉर्टस् ट्रॅक्टरच्या विक्रीत मार्चमध्ये ३१.७ टक्क्यांची घट होऊन ४,२२३ ट्रॅक्टर विकले गेले. गेल्या महिन्यात कंपनीच्या निर्यातीत ४० टक्क्यांची घट होऊ केवळ ६० ट्रॅक्टरच रवाना झाले.
मार्चमध्ये घटला चारचाकी वाहनांचा व्यवसाय
कारच्या विक्रीत प्रमुख कंपन्यांना गेल्या मार्च महिन्यात घट सोसावी लागली. केवळ अशोक लेलँड कंपनीच्या विक्रीत तब्बल २४ टक्क्यांची वाढ झाली
By admin | Updated: April 2, 2015 06:09 IST2015-04-02T06:09:09+5:302015-04-02T06:09:09+5:30
कारच्या विक्रीत प्रमुख कंपन्यांना गेल्या मार्च महिन्यात घट सोसावी लागली. केवळ अशोक लेलँड कंपनीच्या विक्रीत तब्बल २४ टक्क्यांची वाढ झाली
