- प्रसाद गो. जोशी
आंतरराष्ट्रीय बाजारांमधील सकारात्मक वातावरण, पावसाचा व्यक्त झालेला चांगला अंदाज या जोडीलाच आंतरराष्ट्रीय बाजारात खनिज तेलाच्या किंमती स्थिर होण्याची शक्यता निर्माण झाल्याने बाजार वाढला. सुट्यांमुळे अवघे तीन दिवस बाजारात व्यवहार झाले मात्र या काळात बाजार सुमारे चार टक्क्यांनी वाढून बंद झाला.
शेअर बाजाराला डॉ. आंबेडकर जयंती आणि राम नवमीनिमित्त सुटी असल्याने या सप्ताहात बाजारात केवळ तीनच दिवस व्यवहार झाले. या काळात मुंबई शेअर बाजाराचा संवेदनशील निर्देशांक ९५३ अंश म्हणजेच ३.८६ टक्क्यांनी वाढून २५६२६.७५ अंशांवर बंद झाला. राष्ट्रीय शेअर बाजाराचा निर्देशांक (निफ्टी)७८०० अंशांवर पोहोचला आहे. सप्ताहाअखेर तो २९५.२५ अंशांनी वाढून ७८५०.४५ अंशांवर बंद झाला आहे.
बाजारातील तेजीचा फायदा बाजाराच्या क्षेत्रीय निर्देशांकांनाही लाभला. मिडकॅप आणि स्मॉलकॅप या निर्देशांकांमध्ये अनुक्रमे तीन आणि २.६ टक्कयांनी वाढ झाली.
सप्ताहाच्या प्रारंभीच हवामान विभागाने आगामी पावसाबाबतचा जाहीर केलेला अंदाज बाजाराला नवा उत्साह देणारा ठरला. या वर्षी सुमारे १०६ टक्के पाऊस येण्याचा अंदाज हा निश्चितच चांगला आहे. गेली दोन वर्षे सातत्याने दुष्काळाचा सामना करणाऱ्या देशवासियांना हा अंदाज नक्कीच सुखावह आहे. यामुळे बाजारात निर्माण झालेला उत्साह संपूर्ण सप्ताह कायम राहिला.
आंतरराष्ट्रीय बाजारातील खनिज तेलाच्या दरांमधील घसरण आता थांबण्याची चिन्हे आहेत. रशिया आणि सौदी अरेबिया यांनी एक करार करून कच्या तेलाच्या उत्पादनावर नियंत्रण आणण्याला मान्यता दिली आहे. यामुळे आगामी काळात हे दर वाढू लागतील या अंदाजाने जगभरातील शेअर बाजारांमध्ये सकारात्मक वातावरण निर्माण झालेले दिसून आले. याशिवाय येनमध्ये येऊ घातलेली स्थिरता तसेच देशातील दुचाकी विक्रीमध्ये होणाऱ्या वाढीचा अंदाज यामुळेही देशातील शेअर बाजारांमध्ये तेजीचे वातावरण वाढू शकले.
ग्राहक मूल्य निर्देशांकावर आधारित चलनवाढीचा दर हा मार्च महिन्यात ४.८३ टक्क्यांवर आला आहे. या आधीच्या महिन्यात हा दर ५.२६ टक्के एवढा होता. चलनवाढ कमी झाल्यामुळे भारतीय रिझर्व्ह बॅँकेला आणखी व्याजदर कमी करणे शक्य होऊ शकते.
याशिवाय भारतामधील औद्योगिक उत्पादनामध्ये फेब्रुवारीमध्ये झालेली वाढ ही आनंददायक बाब आहे. तीन महिन्यांच्या घसरणीनंतर या उत्पादनामध्ये दोन टक्क्यांनी वाढ झाली. या आकडेवारीचा परिणाम बाजारात आगामी सप्ताहामध्ये दिसून येऊ शकतो. याशिवाय देशभरातील अन्य घटनाही बाजाराची दिशा ठरवू शकतात.
आठवड्यातील घडामोडी
चांगल्या पावसाच्या अंदाजाने बाजारात परतला उत्साह
मिडकॅप आणि स्मॉलकॅप या निर्देशांकांमध्येही वाढ
ग्राहक मूल्य निर्देशांकावर आधारित चलनवाढीचा दर ४.८३ टक्क्यांवर
भारताच्या फेब्रुवारी महिन्यातील औद्योगिक उत्पादनामध्ये सुमारे दोन टक्क्यांनी झाली वाढ
रशिया आणि सौदी अरेबियाने खनिजतेल उत्पादनाबाबत केला करार
अवघ्या तीन दिवसांत चार टक्क्यांची घसघशीत वाढ
आंतरराष्ट्रीय बाजारांमधील सकारात्मक वातावरण, पावसाचा व्यक्त झालेला चांगला अंदाज या जोडीलाच आंतरराष्ट्रीय बाजारात खनिज तेलाच्या किंमती स्थिर होण्याची शक्यता
By admin | Updated: April 18, 2016 02:14 IST2016-04-18T02:14:43+5:302016-04-18T02:14:43+5:30
आंतरराष्ट्रीय बाजारांमधील सकारात्मक वातावरण, पावसाचा व्यक्त झालेला चांगला अंदाज या जोडीलाच आंतरराष्ट्रीय बाजारात खनिज तेलाच्या किंमती स्थिर होण्याची शक्यता
