- मिलिंद कुलकर्णी, जळगाव
भारतातील अल्पभूधारक शेतकऱ्यांपर्यंत उच्च दर्जाचे कृषी तंत्रज्ञान पोहोचवून त्यांच्या जीवनात क्रांती घडविणाऱ्या जैन इरिगेशन सिस्टीम्स लि.च्या योगदानाची ‘फॉर्च्युन’ या प्रतिष्ठित मासिकाने दखल घेणे, आमच्या कार्यसंस्कृतीचा गौरव असल्याची भावना जैन इरिगेशनचे व्यवस्थापकीय संचालक अनिल जैन यांनी ‘लोकमत’ला दिलेल्या विशेष मुलाखतीत व्यक्त केली.
‘यांनी जग घडवलं’ संकल्पनेवर आधारीत जगातील ५१ कंपन्यांची यादी ‘फॉर्च्युन’ने सप्टेंबर २०१५ च्या अंकात प्रसिद्ध केली.
प्रश्न : ‘फॉर्च्युन’च्या यादीत ७ वे स्थान मिळविणे हा जागतिक पातळीवरील गौरव आहे. त्याकडे तुम्ही कसे पाहता?
अनिल जैन : जैन इरिगेशनच्या कार्यसंस्कृतीचा गौरव म्हणून आम्ही या पुरस्काराकडे बघतो. ‘फॉर्च्युन’ मध्ये नाव येणे यास जागतिक पातळीवर प्रतिष्ठा आहे. अलिकडे पंतप्रधान नरेंद्र मोदी अमेरिकेत ‘फॉर्च्युन’ने गौरव केलेल्या ४३ कंपन्यांच्या सीईओंना भेटले, त्यावरुन यादीचे महत्त्व लक्षात येते. अर्ज न मागवता हे मासिक प्रख्यात आंतरराष्ट्रीय संस्थांच्या तज्ज्ञांची मदत घेऊन औद्योगिक संस्थांच्या कामकाजाचे विश्लेषण करते. एखाद्या उत्पादनामुळे ग्राहकाच्या जीवनात आमुलाग्र बदल घडला आहे का, यास महत्त्व असते. सीएसव्ही (क्रीएटिंग शेअर व्हॅल्यू) ही नाविन्यपूर्ण संकल्पना ‘फॉर्च्युन’ने मांडली आहे.
प्रश्न : सीएसव्ही संकल्पना काय आहे?
अनिल जैन : जैन इरिगेशन १९६४ पासून या संकल्पनेवर काम करीत आहे. माझे वडील आणि जैन इरिगेशनचे संस्थापक अध्यक्ष भवरलाल जैन यांनी खेडोपाडी जाऊन शेतकऱ्यांना अत्याधुनिक शेती तंत्रज्ञानाची माहिती व प्रशिक्षण दिले. हे तंत्रज्ञान बांधापर्यंत पोहोचविले. त्यामुळे कमी खर्चात शेतकरी अधिक उत्पादन घेऊ लागले.
त्यामुळे परंपरागत शेती करणाऱ्यांच्या जीवनात बदल झाला. एक उदाहरण देतो. जैन इरिगेशनने ठिबक सिंचन यंत्रणा एका शेतकऱ्याला विकली. त्याची किंमत एक लाख होती. ७ हजार रुपये आमचा नफा झाला. शेतकऱ्याची पाण्याची बचत झाली आणि उत्पादकता देखील वाढली. पहिल्या वर्षी हेक्टरी एक लाख रुपये त्याने कमविले. सात वर्षांत ७ लाख रुपये कमविले. आम्ही यंत्रणा एकदाच विकली, परंतु त्याचा लाभ शेतकऱ्याला अनेक वर्षे झाला. तो सधन झाला. तो नवीन घर, ट्रॅक्टर घेऊ शकला. मुलांना शिक्षण देऊ शकला. स्वाभाविकपणे समाजात आर्थिक उलाढाल वाढली.
प्रश्न : शेतकऱ्यांनी पारंपरिक शेतीऐवजी तंत्रज्ञानाचा उपयोग केल्यास कृषी क्षेत्रासोबतच त्यांच्या जीवनात बदल घडू शकेल?
अनिल जैन : निश्चितच. भारतातील एकूण क्षेत्रापैकी शेतीसाठी वापरले जाणारे क्षेत्र जगाच्या तुलनेत सर्वाधिक आहे. देशात १२ कोटी शेतकरी आहेत. एका शेतकऱ्याच्या कुटुंबात पाच व्यक्ती म्हटल्या तरी ६० कोटी म्हणजे निम्मी लोकसंख्या कृषी क्षेत्राशी निगडीत आहे. त्यातही २ - ३ एकर म्हणजे अल्पभूधारक शेतकऱ्यांची संख्यादेखील खूप आहे. त्यांना मदत करण्याचा प्रयत्न जैन इरिगेशनने केला आहे. त्यांना अत्याधुनिक कृषी तंत्रज्ञान पुरविणे, उत्पादन वाढीच्यादृष्टीने नवनवीन संशोधन, टिश्यू कल्चर उपलब्ध करुन देणे. केळी, कांदा, आंब्यासारखी उत्पादने विकत घेण्याचेही काम आम्ही नियमित करीत आहोत. कांद्यासाठी तर करारपद्धतीने शेती (कॉन्ट्रॅक्ट फार्मिंग) हा उपक्रम आम्ही राबविला. आमच्या तंत्रज्ञानामुळे कांदा उत्पादनात मोठी वाढ झाली. पुन्हा खरेदीदराविषयी शेतकरीहिताचे सूत्र ठरविले.
प्रश्न : जैन इरिगेशनची कार्यसंस्कृती म्हणजे नेमके काय?
अनिल जैन : ‘कल्पना कणापरी, ब्रह्मांडाचा भेद करी’ हे आमचे ब्रीदवाक्य आहे. त्यानुसार आम्ही वाटचाल करीत आहोत. पिकांना गरजेनुसार केव्हा व किती पाणी हवे, याची स्वयंचलित यंत्रणा कंपनीने विकसीत केली असून ती शेतकऱ्यांच्या बांधावर यशस्वीपणे रुजवली आहे. उपग्रहाद्वारे मोबाईलच्या सहाय्याने ती हाताळणे शक्य झाले आहे. ‘ग्लोबल मॅन्युफॅक्चरिंग प्रॅक्टीसेस’ उपक्रमांतर्गत जागतिक बँकेच्या सहकार्याने छोट्या शेतकऱ्यांना कंपनी प्रशिक्षण देत आहे. त्यामुळे फळांच्या निर्यातीसाठी मदत होत आहे.
तीन वर्षांपासून कंपनी नॉन बँकिंग फायनान्स करत असून राज्यातील २२ हजार शेतकऱ्यांना कर्जवाटप केले आहे. भाज्यांपासून ऊसापर्यंतच्या पिकांना १ ते ३ वर्षांच्या कालावधीसाठी कर्ज दिले जाते. ज्ञान, तंत्रज्ञान, अर्थसहाय्य व बाजारपेठ असे सर्वप्रकारचे सहकार्य शेतकऱ्यांना उपलब्ध करुन देणारी जैन इरिगेशन देशातील एकमेव कंपनी असल्याने हार्वर्ड बिझिनेस स्कूल आणि जागतिक ख्यातीचे व्यवस्थापन तज्ज्ञ डॉ. रे. गोल्डबर्ग यांना कंपनीचा स्वतंत्रपणे अभ्यास करावासा वाटतो, हा माझ्या मते आमच्या कार्यसंस्कृतीचा गौरव आहे.
प्रश्न : सौर पंप उत्पादनावर कंपनीने आता लक्ष केंद्रित केले आहे. त्याची वाटचाल कशी आहे?
अनिल जैन : जैन इरिगेशन सौर उत्पादनाच्या निर्मितीत भारतात सर्वात आघाडीवर आहे. जागतिक पातळीवर उच्चांक स्थापन करण्याच्यादृष्टीने आमचे प्रयत्न आहेत. भारतीय उपखंड, आशिया व आफ्रिका खंडावर आम्ही लक्ष केंद्रित करीत आहोत. ४० टक्के स्वच्छ उर्जेचे केंद्र सरकारचे उद्दिष्ट्य आहे. त्याला सौर पंपांचा विषय पूरक ठरणार आहे. सौर पंपांसाठी शेतकऱ्यांना सवलत दिल्यास ते आकर्षित होतील.
प्रश्न : दुष्काळ , शेतकरी आत्महत्या, कृषी क्षेत्राची दूरवस्था या विषयी आपल्याला काय वाटते?
अनिल जैन : भारतातील शेती केवळ चार महिन्यांच्या मान्सूनवर अवलंबून आहे. त्यातही पारंपरिक आणि एकसुरी शेतीमुळे पाण्याचा प्रचंड उपसा होत आहे. रासायनिक खतांच्या माऱ्यामुळे मातीची जैविक संरचना बिघडत आहे.
ऊसासारख्या पिकासाठी पाण्याचा प्रचंड वापर होत आहे, ऊसाखालील एकूण क्षेत्रापैकी १२ टक्के क्षेत्र ठिबक सिंचनाखाली आहे. शेतकरी अशिक्षित असला तरी हुशार आणि मेहनती आहे. त्याला मदत करावी लागेल. पण ही मदत उत्पादकता वाढीसाठी करायला हवी, तरच तो ताठ मानेने उभा राहू शकेल.
ठिबक सिंचन यंत्रणा राबविणारी पहिली कंपनी
जैन इरिगेशन सिस्टीम्स लि. ही सुमारे ४,२५० कोटींवर उलाढाल करणारी आणि चारही खंडात २७ कारखान्यांद्वारे व्यवसाय करणारी कंपनी आहे. सुमारे ६,७०० पेक्षा अधिक वितरक आणि विक्रेत्यांच्या जाळ्याच्या आधारे सुमारे ११६ देशांमध्ये कंपनीची उत्पादने वापरली जातात.
‘जबाबदार भांडवलशाही’
तंत्रज्ञान व जागतिकीकरणाच्या लाभामुळे गरीब-श्रीमंतांमधील दरी अधिक वाढली. ती दूर करण्यासाठी जबाबदार भांडवलशाही ही नवीन संकल्पना मांडली जात आहे. ‘फॉर्च्युन’च्या यादीतील कंपन्यांनी नवनवीन मार्ग शोधून जबाबदार भांडवलशाहीच्या शक्तीचा उपयोग सामाजिक उणिवा दूर करण्यासाठी केला.
एकमेव भारतीय कंपनी
जळगावची जैन इरिगेशन या भारतातील एकमेव कंपनीचा ‘फॉर्च्युन’च्या यादीत समावेश झाला आहे.
‘फॉर्च्युन’चा पुरस्कार हा ‘जैन इरिगेशन’च्या कार्यसंस्कृतीचा गौरव
भारतातील अल्पभूधारक शेतकऱ्यांपर्यंत उच्च दर्जाचे कृषी तंत्रज्ञान पोहोचवून त्यांच्या जीवनात क्रांती घडविणाऱ्या जैन इरिगेशन सिस्टीम्स लि.च्या योगदानाची ‘फॉर्च्युन’ या
By admin | Updated: October 8, 2015 05:02 IST2015-10-08T05:02:47+5:302015-10-08T05:02:47+5:30
भारतातील अल्पभूधारक शेतकऱ्यांपर्यंत उच्च दर्जाचे कृषी तंत्रज्ञान पोहोचवून त्यांच्या जीवनात क्रांती घडविणाऱ्या जैन इरिगेशन सिस्टीम्स लि.च्या योगदानाची ‘फॉर्च्युन’ या
