नवी दिल्ली/मुंबई : १00 विदेशी गुंतवणूक संस्थांना (एफआयआय) कर विभागाने करवसुलीसाठी नोटिसा बजावल्या आहेत. भारतीय बाजारात कमावलेल्या पैशावर तब्बल ५ ते ६ अब्ज डॉलरचा कर दिला नसल्याचा आरोप या कंपन्यांवर आहे. या प्रकरणी कर विभागाकडून आढावा घेण्याचे काम अजूनही सुरूच असून, आणखी अनेक संस्था कर चुकवेगिरीच्या जाळ्यात सापडू शकतात. एका अंदाजानुसार, एकूण १0 अब्ज डॉलरचा कर या संस्थांनी बुडविला आहे.
उच्चस्तरीय सूत्रांनी सांगितले की, ३१ मार्चपर्यंत १00 विदेशी गुंतवणूक संस्थांना कर विभागाने मिनिमम अल्टरनेटिव्ह टॅक्स (मॅट) बुडविल्याप्रकरणी नोटिसा बजावल्या आहेत. भारतीय बाजारात कमावलेल्या पैशांवर २0 टक्के मॅट लागू होतो. नोटिसा बजावल्यानंतर आता कर विभाग त्याचा पाठपुरावा करीत असून असेसमेंट आॅडर्स जारी केल्या जात आहेत.
नोटिसा बजावण्यात आलेल्या विदेशी गुंतवणूक संस्थांनी या नोटिसांना विरोध केला आहे. एफआयआय आणि एफपीआय अशा दोन्ही प्रकारच्या विदेशी गुंतवणूक संस्थांना मॅट कर लागूच होत नाही, असे या संस्थांचे म्हणणे आहे. या संस्थांनी जो काही पैसा भारतात कमावला आहे, तो ‘व्यावसायिक उत्पन्न’ या व्याख्येत बसत नाही. आयकर कायद्यानुसार भांडवली मिळकतीच्या व्याख्येत ते येते.
नोटिसा बजावण्यात आलेल्या अनेक विदेशी गुंतवणूक संस्थांनी (एफआयआय) स्वत:ला फॉरेन पोर्टफोलिओ इन्व्हेस्टर्समध्ये (एफपीआय) रूपांतरित करून घेतले आहे. यात युरोप आणि अमेरिकेतील संस्थांची संख्या मोठी आहे. याशिवाय सिंगापूर, हाँगकाँग आणि मॉरिशस येथीलही काही संस्था आहेत.
या संस्थांनी हा मुद्दा अर्थमंत्री अरुण जेटली आणि अर्थ राज्यमंत्री जयंत सिन्हा यांच्यासमोर उपस्थित केला आहे. याशिवाय सेबी, सेंट्रल बोर्ड आॅफ डायरेक्ट टॅक्सेस, तसेच अर्थ मंत्रालयातील वरिष्ठ अधिकाऱ्यांकडेही याबाबत आपले म्हणणे त्यांनी मांडले आहे. आता थेट पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याकडेच गाऱ्हाणे मांडण्याची तयारी त्यांनी चालविली आहे. (लोकमत न्यूज नेटवर्क)
विदेशी फंडांनी बुडविला १0 अब्ज डॉलरचा कर !
१00 विदेशी गुंतवणूक संस्थांना (एफआयआय) कर विभागाने करवसुलीसाठी नोटिसा बजावल्या आहेत. भारतीय बाजारात कमावलेल्या पैशावर तब्बल ५ ते ६ अब्ज डॉलरचा
By admin | Updated: April 6, 2015 02:50 IST2015-04-06T02:50:02+5:302015-04-06T02:50:02+5:30
१00 विदेशी गुंतवणूक संस्थांना (एफआयआय) कर विभागाने करवसुलीसाठी नोटिसा बजावल्या आहेत. भारतीय बाजारात कमावलेल्या पैशावर तब्बल ५ ते ६ अब्ज डॉलरचा
