मुंबई : शेअर बाजारांनी मंगळवारी विक्रमी झेप घेतली खरी; मात्र नंतर नफावसुलीचे सत्र सुरू झाल्याने बाजार खाली आले. मुंबई शेअर बाजाराचा सेन्सेक्स १५ अंकांनी कोसळून २८,१६३.२९ अंकांवर बंद झाला.
एचडीएफसी, टीसीएस, इन्फोसिस, सन फार्मा, ओएनजीसी, टाटा मोटर्स, हिंदाल्को आणि एचयूएल या आघाडीच्या कंपन्यांचे समभाग कोसळले. एचडीएफसी बँक, एल अँड टी, सेसा स्टरलाईट, भारती एअरटेल, टाटा स्टील आणि भेल या कंपन्यांच्या समभागांनी घसरणीचा मुकाबला केला.
३0 कंपन्यांचा समावेश असलेल्या सेन्सेक्सने सकाळी तेजीने प्रारंभ केला. नंतर तो वाढतच गेला. एका क्षणी २८,२८२.८५ अंकांपर्यंत तो वर चढला होता. त्यानंतर मात्र बाजारात नफावसुलीचे सत्र सुरू झाले. विक्रीचा जबर मारा झाला. त्यामुळे सेन्सेक्सने कमावलेले अंक गमावले. १४.५९ अंकांची घसरण नोंदवून सेन्सेक्स २८,१६३.२९ अंकांवर बंद झाला. गेल्या दोन सत्रांत सेन्सेक्सने २३७.२४ अंक कमावले आहेत. ही वाढ 0.८५ टक्के आहे. या दोन्ही सत्रात सेन्सेक्स नव्या उंचीवर पोहोचला होता.
ब्रोकरांनी सांगितले की, बाजार सध्या मोठ्या उंचीवर आहे, अशा पातळीवर नफा वसुली नैसर्गिकच आहे. सोन्याची आयात रोखण्यासाठी सरकारकडून काही नव्या उपायांची घोषणा होण्याची शक्यता असल्याचा प्रतिकूल परिणाम बाजारावर झाला.
५0 कंपन्यांच्या व्यापक आधारावरील नॅशनल स्टॉक एक्स्चेंजचा सीएनएक्स निफ्टी ४.८५ अंकांनी खाली आला. ही घसरण 0.0६ टक्के आहे. तो ८,४२५.९0 अंकांवर बंद झाला. याच दरम्यान त्याने आज ८,४५४.५0 अंकांची सार्वकालीन सर्वोच्च पातळी गाठली होती.
गुंतवणूकदारांना बाजारातील ओघ सुरूच आहे. विदेशी गुंतवणूकदारांनी काल ६५६.३७ कोटी रुपयांची गुंतवणूक शेअर बाजारात केली.
बीएसईमधील निर्देशांकांपैकी भांडवली वस्तू निर्देशांक सर्वाधिक १.६१ टक्क्यांनी वर चढला. त्यापाठोपाठ ऊर्जा निर्देशांक १.३३ टक्क्यांनी, तर धातू निर्देशांक १.३३ टक्क्यांनी वर चढला. मुंबई शेअर बाजाराचा एकूण व्याप सकारात्मक राहिला. १,७४३ कंपन्यांचे समभाग वाढले. १,३६६ कंपन्यांचे समभाग घटले. बाजाराची एकूण उलाढाल ३,६५७.५१ कोटी झाली. काल ती ३,३९८.९७ कोटी होती. (प्रतिनिधी)
सेन्सेक्सचा आधी विक्रम, नंतर घसरगुंडी
शेअर बाजारांनी मंगळवारी विक्रमी झेप घेतली खरी; मात्र नंतर नफावसुलीचे सत्र सुरू झाल्याने बाजार खाली आले. मुंबई शेअर बाजाराचा सेन्सेक्स १५ अंकांनी कोसळून २८,१६३.२९ अंकांवर बंद झाला.
By admin | Updated: November 19, 2014 06:02 IST2014-11-19T01:08:14+5:302014-11-19T06:02:10+5:30
शेअर बाजारांनी मंगळवारी विक्रमी झेप घेतली खरी; मात्र नंतर नफावसुलीचे सत्र सुरू झाल्याने बाजार खाली आले. मुंबई शेअर बाजाराचा सेन्सेक्स १५ अंकांनी कोसळून २८,१६३.२९ अंकांवर बंद झाला.
