नवी दिल्ली : रिझर्व्ह बँकेच्या दुसऱ्या द्विमासिक पतधोरण आढाव्याच्या आधी अर्थमंत्री अरुण जेटली यांनी रिझर्व्ह बँकेचे गव्हर्नर रघुराम राजन यांच्याकडून दर कपातीची अपेक्षा व्यक्त केली.
येत्या २ जून रोजी रिझर्व्ह बँक द्विमासिक पतधोरण आढावा जाहीर करणार आहे. या पार्श्वभूमीवर वृत्तसंस्थेने अरुण जेटली यांची एक मुलाखत घेतली आहे. रिझर्व्ह बँकेच्या आगामी पतधोरण आढाव्यात आपणास काय अपेक्षित आहे, या प्रश्नावर जेटली म्हणाले की, तुम्हाला जे अपेक्षित आहे तेच मला अपेक्षित आहे.
२0१५ मध्ये रिझर्व्ह बँकेने व्याजदरात दोन वेळा कपात केली आहे. तथापि, ७ एप्रिल रोजी द्विमासिक पतधोरण आढाव्यात जैसे थे स्थिती कायम ठेवली होती. सध्या रेपो रेट ७.५ टक्के असून सीआरआर ४ टक्के आहे. व्यावसायिक बँकांना रिझर्व्ह बँकेकडून मिळणाऱ्या कर्जावरील व्याजास रेपो रेट असे म्हणतात. तसेच रिझर्व्ह बँकेकडे बँकांचा जो राखीव निधी ठेवला जातो, त्याला सीआरआर असे म्हटले जाते.
अर्थतज्ज्ञांच्या मते, महागाईचा दर आता खूप खाली आला आहे. किरकोळ क्षेत्रातील महागाईचा दर आता ४.८७ टक्क्यांवर आला आहे. त्याच वेळी कारखाना उत्पादनाचा वेग २.१ पर्यंत घसरला आहे. ठोक महागाईचा दर उणे (-) २.६५ अंकांवर आहे. त्यामुळे पुढच्या पतधोरण आढाव्यात महागाईच्या मुद्यावर लक्ष केंद्रित करण्याची गरज राहणार नाही.