वॉशिंग्टन : शेअर बाजार कोसळल्याने वित्तीय संकटात सापडलेल्या अमेरिकेत अमेरिकी फेडरल बँकेने सात वर्षात प्रथमच व्याजदरात ०.२५ टक्क्यांनी वाढ केली. अमेरिकी फेडरल बँकेच्या या निर्णयाचा जागतिक अर्थव्यवस्थेवर काय परिणाम होतो याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
अमेरिकी फेडरल बँकेच्या संचालक मंडळाच्या अध्यक्ष जेनेट येलेन यांनी पत्रकारांना सांगितले की, फेडरल ओपन मार्केट कमिटीने संघीय निधीसाठी व्याजदरात ०.२५ टक्के (पाव टक्का) वाढ करण्याचा निर्णय घेतला आहे. गेल्या सात वर्षांपासून अमेरिकेत व्याजदर जवळपास शून्य टक्के होते. सात वर्षात प्रथमच अशाप्रकारे व्याजदरात वाढ करण्यात आली आहे. आर्थिक मंदीतून देशाला बाहेर काढण्यासाठी ही व्याज दरवाढ करण्यात आली असल्याचे त्या म्हणाल्या.
येलेन म्हणाल्या की, रोजगार वाढविणे, उत्पन्न वाढविणे आणि कोट्यवधी अमेरिकी नागरिकांच्या आर्थिक अडचणी दूर करण्यासाठी करण्यात आलेल्या प्रयत्नात उल्लेखनीय प्रगती झाली आहे. आर्थिक सुधारकांचा प्रवास अद्याप बराच असून तो पूर्ण झालेला नाही. आमच्या निर्णयाने अर्थव्यवस्था मजबूत होणार आहे.
येलेन म्हणाल्या की, रोजगाराच्या क्षेत्रात आणखी प्रगती होण्यास वाव आहे. महागाईचा दर आम्ही निश्चित केलेल्या उद्दिष्टापेक्षा खाली आहे. त्यामुळेच व्याजदर वाढीचा निर्णय उचित आहे. व्याजदरात वाढ करण्यात आली असली तरीही पतधोरण उदार राहील, असा विश्वास वाटतो. व्याजदर हळूहळू साधारण स्तरावर नेण्याची प्रक्रिया चालूच राहील. रोजगाराचे उद्दिष्ट आणि दोन टक्के महागाईचा दर याबाबत अर्थव्यवस्था कशी प्रगती करते यावर ते अवलंबून आहे. रोजगाराच्या क्षेत्रात सुधारणा झाल्यास व्याजदर वाढविले जातील असे आम्ही मार्चमध्येच स्पष्ट केले होते.
येलेन यांनी सांगितले की, अमेरिकेच्या सकल घरेलू उत्पादनाचा वृद्धीदर यंदा २.१ टक्के आणि २०१६ मध्ये २.५ टक्के राहण्याचा अंदाज आहे. व्याजदरातील वाढ करण्यापूर्वी विकसनशील बाजारांना पूर्व कल्पना देण्यात आली होती. अमेरिकेच्या अर्थव्यवस्थेचा परिणाम या देशांच्या अर्थव्यवस्थेवर होतो हे खरे आहे.
आता केवळ ०.२५ टक्के व्याजदर वाढ करण्यात आली आहे. पतधोरण उदार राहिल्यास भविष्यात काय परिणाम होतो, यावर आम्ही नजर ठेवून आहोत. त्यानंतर भविष्यातील निर्णय घेतले जातील, असे त्यांनी स्पष्ट केले.
परिस्थितीला तोंड देण्यास भारत तयार...
अमेरिकेची मध्यवर्ती बँक फेडरल रिझर्व्हने धोरणात्मक व्याजदरात केलेल्या वाढीच्या परिणामाबद्दल भारतीतील के्रडिट रेटिंग एजन्सीजनी बहुतांश सकारात्मक प्रतिक्रिया व्यक्त केल्या आहेत.फिच रेटिंग्जनुसार भारत फेडरल रिझर्व्हच्या या निर्णयामुळे निर्माण होणाऱ्या संभाव्य धक्क्यांपासून बाजारांना दूर राहू ठेवू शकणार नाही. मुडीज इन्व्हेस्टर्स सर्व्हिसनुसार भारत यासाठी तयार आहे. भारत कोणत्याही प्रकारच्या परिस्थितीला तोंड द्यायला तयार आहे, असे एजन्सीजचे म्हणणे आहे.
मुडीजचे म्हणणे असे आहे की,‘‘फेडरल रिझर्व्हच्या निर्णयामुळे उदयोन्मुख देशांच्या भांडवल प्रवाहात चढउतार बघायला मिळू शकतील. परंतु भारत अशा परिस्थितीला तोंड द्यायला सक्षम आहे.’’
एजन्सीचे उपाध्यक्ष राहुल घोष यांनी वृत्तसंस्थेशी बोलताना सांगितले की, चालू खात्यावरील घटलेली तूट आणि अपेक्षेनुसार कमी बाह्य कर्ज बघता भारतावर इतर उदयोन्मुख बाजारपेठांच्या तुलनेत कमी परिणाम होईल असे दिसते.
सरकार म्हणते.... भारतावर ‘किरकोळ परिणाम’ शक्य
नवी दिल्ली : अमेरिकी फेडरल बँकेची व्याजदर वाढ अपेक्षितच होती. त्याचा मुकाबला करण्याची भारतीय बाजाराने अगोदरच तयारी केली होती. या दरवाढीचा भारतावर फार किरकोळ परिणाम होईल आणि फार मोठ्या प्रमाणावर उलथापालथ होणार नाही. त्याचबरोबर प्रचंड प्रमाणात विदेशी निधी काढून घेतला जाणार नाही, असा विश्वास भारत सरकारने व्यक्त केला.
अमेरिकी फेडरल बँकेने बुधवारी रात्री केलेली व्याजदरातील पाव टक्का दरवाढ अपेक्षितच होती. या दरवाढीमुळे भारतासारख्या विकसनशील बाजारपेठेतून विदेशी भांडवल काढून घेतले जाण्याची शक्यताही वर्तविण्यात येत आहे.
या पार्श्वभूमीवर ही भीती निराधार असल्याचे भारतीय शेअर बाजाराने दाखवून दिले. गुरुवारी सेन्सेक्स ३०० अंकांपेक्षा जास्त वधारला. फेडरल बँकेची व्याजदर वाढ अपेक्षितच होती, असे त्यातून स्पष्ट होते.
अमेरिकेत २००७-२००९ या काळात प्रचंड आर्थिक मंदी आली होती. त्यावेळी झालेल्या परिणामातून अमेरिका आता सावरली असल्याचे व्याजदर वाढीतून ध्वनीत होते. शेअर बाजाराप्रमाणेच व्याजदर वाढीचा रुपयावरही परिणाम झाला
नाही.
दुपारच्या सत्रात एक अमेरिकी डॉलरच्या तुलनेत रुपया ६६.५१ या स्तरावर पोहोचला. गेल्या दोन आठवड्यांतील रुपयाचा हा सर्वोच्च स्तर आहे.
व्याजदरवाढीचा संभ्रम आता संपुष्टात आला असून निर्माण झालेल्या नवीन परिस्थितीचा मुकाबला करण्यासाठी भारतीय बाजारांनी तयारी केली पाहिजे. त्याप्रमाणे तडजोड करावी लागेल.
-अरुण जेटली,
केंद्रीय अर्थमंत्री
भविष्यात फेडरल बँक व्याजदरात आणखी किती दरवाढ करते हे आम्हाला पाहावे लागेल. व्याजदरवाढीने होणाऱ्या उलथापालथीला तोंड देण्यासाठी आम्ही अगोदरच तयारी केली होती.
-जयंत सिन्हा,
अर्थराज्यमंत्र
ही व्याजदर वाढ जगभरात अपेक्षितच होती. भारताची अर्थव्यवस्था मजबूत आणि व्यापक आहे, त्यामुळे व्याजदर वाढीचा भारतावर फार किरकोळ परिणाम होईल.
-अरविंद सुब्रह्मण्यम
मुख्य आर्थिक सल्लागार
व्याजदर वाढीमुळे देशातून काही प्रमाणात विदेशी भांडवल बाहेर जाऊ शकते. शेअर बाजारावरही किरकोळ परिणाम होऊ शकतो. फार मोठ्या प्रमाणावर नकारात्मक परिणाम होणार नाही.
-सी- रंगराजन,
रिझर्व्ह बँकेचे माजी गव्हर्नर
फेडरल बँकेची व्याजदर वाढ ‘सर्वसमावेशक’ असून उगवत्या बाजारांसाठी ती फायदेशीरच ठरणार आहे. या व्याजदर वाढीने भारतातून फार मोठ्या प्रमाणावर विदेशी भांडवल जाणार नाही, अशी अपेक्षा आहे. -शक्तिकांत दास, आर्थिक बाबींचे सचिव
फेडरल बँकेने ७ वर्षांनंतर व्याजदर वाढविले
शेअर बाजार कोसळल्याने वित्तीय संकटात सापडलेल्या अमेरिकेत अमेरिकी फेडरल बँकेने सात वर्षात प्रथमच व्याजदरात ०.२५ टक्क्यांनी वाढ केली. अमेरिकी फेडरल बँकेच्या
By admin | Updated: December 18, 2015 01:52 IST2015-12-18T01:52:25+5:302015-12-18T01:52:25+5:30
शेअर बाजार कोसळल्याने वित्तीय संकटात सापडलेल्या अमेरिकेत अमेरिकी फेडरल बँकेने सात वर्षात प्रथमच व्याजदरात ०.२५ टक्क्यांनी वाढ केली. अमेरिकी फेडरल बँकेच्या
