Lokmat Money > बिझनेस न्यूज > दोन आठवड्यांनंतर बाजारात तेजीचा संचार

दोन आठवड्यांनंतर बाजारात तेजीचा संचार

परकीय वित्तसंस्थांची जोरदार खरेदी यामुळे शेअर बाजाराचे निर्देशांक दोन आठवड्यांनंतर वाढीव पातळीवर बंद झाले.

By admin | Updated: September 5, 2016 05:32 IST2016-09-05T05:32:12+5:302016-09-05T05:32:12+5:30

परकीय वित्तसंस्थांची जोरदार खरेदी यामुळे शेअर बाजाराचे निर्देशांक दोन आठवड्यांनंतर वाढीव पातळीवर बंद झाले.

Fast communication in the market after two weeks | दोन आठवड्यांनंतर बाजारात तेजीचा संचार

दोन आठवड्यांनंतर बाजारात तेजीचा संचार


जगभरातील शेअर बाजारांमध्ये असलेले अनुकूल वातावरण, फ्युचर आणि डेरिव्हेटीव्हज्मधील सकारात्मक वातावरण, भारतीय रिझर्व्ह बॅँकेचा अर्थव्यवस्थेबाबतचा सकारात्मक अहवाल आणि परकीय वित्तसंस्थांची जोरदार खरेदी यामुळे शेअर बाजाराचे निर्देशांक दोन आठवड्यांनंतर वाढीव पातळीवर बंद झाले. बाजाराच्या जवळपास सर्वच निर्देशांकांमध्ये वाढ झाल्याने ही तेजी सर्वव्यापीच ठरली.
गतसप्ताह मुंबई शेअर बाजारामध्ये तेजीचा राहिला. आधीच्या दोन सप्ताहांमधील बाजाराची घसरण कुठच्या कुठे गेली. विशेष म्हणजे संवेदनशील निर्देशांकाने २८ हजारांची तर निफ्टीने ८८०० अंशांची पातळी ओलांडल्याने गुंतवणूकदारांना काहीसा भावनिक दिलासा मिळाला आहे. बाजाराच्या बहुसंख्य क्षेत्रीय निर्देशांकांमध्येही वाढ झाली आहे.
मुंबई शेअर बाजाराच्या संवेदनशील निर्देशांकामध्ये सप्ताहामध्ये ७४९.८६ अंश म्हणजेच २.७० टक्क्यांनी वाढ झाली. २७७८२.२५ अंशांवरून हा निर्देशांक २८५३२.११ अंशांवर बंद झाला. राष्ट्रीय शेअर बाजाराचा निर्देशांक (निफ्टी)मध्येही २.७७ टक्के म्हणजे २३७.१० अंशांची वाढ होऊन तो ८८०९.६५ अंशांवर बंद झाला. दोन सप्ताहांनंतर बाजारामध्ये वाढ झाल्याने गुंतवणूकदारांमध्ये उत्साहाचे वातावरण आहे.
गेल्या काही महिन्यांपासून परकीय वित्तसंस्थांकडून भारतीय बाजारात सातत्याने खरेदी होत असली तरी त्याच्या पॅटर्नमध्ये बदल झालेला दिसून येत आहे. समभागांमध्ये या संस्थांची मोठी गुंतवणूक सुरू असली तरी कर्जरोखे (डेट) या प्रकारामध्ये मात्र या संस्थांकडून विक्री केली जात आहे. अमेरिकेतील व्याजदर वाढण्याच्या अपेक्षेने हा बदल झाला असावा. गतसप्ताहामध्येही या वित्तसंस्थांनी समभागांमध्ये २१७२.७५ कोटी रुपये गुंतविले मात्र कर्जरोख्यांमधून या संस्थांनी ९४१.४३ कोटी रुपये काढले.
भारतीय चलन रुपयासाठीही गतसप्ताह चांगला ठरला. सप्ताहात डॉलरच्या तुलनेत रुपयाचे मूल्य ०.२८ टक्के म्हणजे १९ पैसे वाढून ६६.८४ पैशांवर आले आहे. फ्युचर आणि आॅप्शन्सच्या व्यवहारांच्या सौदापूर्तीमध्येही तेजीचे वातावरण दिसून आल्यामुळे बाजाराला त्याचा फायदा झाला आहे. रिलायन्सचे अध्यक्ष मुकेश अंबानी यांच्या रिलायन्स जिओच्या घोषणेनंतर टेलिकॉम आस्थापनांना जोरदार झटका बसला. अनेकांनी रिलायन्सच्या प्रतिस्पर्ध्यांचे समभाग विक्रीला काढल्याने या निर्देशांकामध्ये घसरण दिसून आली.
भारतीय रिझर्व्ह बँकेने भारतीय अर्थव्यवस्थेचा वृद्धीदर ७.६ टक्के राहण्याचा व्यक्त केलेला अंदाज आणि निती आयोगाच्या उपाध्यक्षांचे अनुकूल विधान यांचाही बाजाराच्या वाढीला हातभार लागल्याचे दिसून आले.
>आठवड्यातील घडामोडी : जगभरातील शेअर बाजारांमध्ये असलेल्या तेजीचा
भारतीय बाजारांना फायदा, भारतीय अर्थव्यवस्थेबाबत रिझर्व्ह बॅँकेच्या अहवालामुळे बाजारात तेजीचे वारे, भारतीय चलन रुपयाच्या मूल्यात डॉलरच्या तुलनेमध्ये वाढ, परकीय वित्तसंस्थांची बाजारातील समभागांची खरेदी कायम, डेट मार्केटमध्ये मात्र सुरू आहे मोठ्या प्रमाणावर विक्री.
-प्रसाद गो. जोशी

Web Title: Fast communication in the market after two weeks

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.