पंदेकृवि : राज्यस्तरीय संशोधन आढावा समितीच्या मान्यतेची प्रतीक्षा
अकोला : राज्यातील घटलेले तेलबिया उत्पादन वाढविण्याकडे कृषी विद्यापीठांनी लक्ष केंद्रित केले असून, तेलबियांचे नवनवीन संकरित (हायब्रीड) बियाणे विकसित करण्यावर भर दिला जात आहे. डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठाने सूर्यफुलाचे असेच एक भरघोस उत्पादन देणारे संकरित वाण विकसित केले आहे. आता या बियाण्याला राज्यस्तरीय संशोधन आढावा सभेच्या मान्यतेची प्रतीक्षा आहे.
राज्यात सन २०११ पर्यंत भुईमूग, तीळ, जवस, सूर्यफूल, करडई, करडा व सोयाबीन या तेलबिया पिकांचे ४० लाख हेक्टरवर उत्पादन घेतले जात होते. यात आता चार लाख हेक्टरने घट झाली असून, ३६ लाख हेक्टर क्षेत्र या पिकाच्या लागवडीखाली उरले आहे. विशेष म्हणजे, अलीकडच्या काही वर्षांत सोयाबीनचे क्षेत्र वाढले. या ३६ लाख हेक्टर क्षेत्रामध्ये सोयाबीनचा वाटा ३० लाख हेक्टर आहे. राज्यातील भुईमुगाचे क्षेत्र सात लाख हेक्टर होते, ते तीन लाख हेक्टर उरले आहे. यामध्ये खरिपातील दोन लाख व उन्हाळी हंगामातील एक लाख हेक्टरचा समावेश आहे. करडईचे क्षेत्र ८० हजार हेक्टरवर आले आहे. सूर्यफुलाचे क्षेत्र २ लाख ६९ हेक्टरवरून एक लाख हेक्टरपर्यंतघसरले आहे. या पृष्ठभूमीवर अकोला येथील कृषी विद्यापीठाने गुलाबी, बिनकाट्याच्या करडी पिकाचे वाण विकसित केले आहे, तसेच भुईमूग ३०३ व इतर वाणांच्या विकासावर भर दिला आहे.
दरम्यान, सूर्यफुलाचे तेल हे आयुर्वेदात आरोग्यदायी मानले जात असल्याने या तेलाची मागणी वाढती आहे. याकरिता कृषी विद्यापीठाने या अगोदर पीकेव्ही एसएच-२७ हे संकरित वाण तयार करून बियाणे बाजारात आणले होते. या वाणाला शेतकऱ्यांचा प्रतिसाद बघता, आता दुसरे संकरित वाण विकसित केले असून, या वाणापासून हेक्टरी १८ क्विंटल उत्पादन अपेक्षित आहे. या संकरित सूर्यफूल वाणाला या महिन्याच्या शेवटी राहुरी येथे महात्मा फुले कृषी विद्यापीठात होणाऱ्या राज्यस्तरीय संशोधन आढावा समितीसमोर मांडण्यात येणार आहे.
४डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. आर. जी. दाणी यांच्या मार्गदर्शनात तेलबिया वाणांसह इतर सर्वच पिकांच्या वाणावर संशोधन करण्यात येत आहे. सूर्यफुलाचे हे नवीन संकरित वाण आहे. या वाणाला राज्यस्तरीय संशोधन आढावा सभेत मांडल्यानंतरच या विषयी अधिक बोलता येईल. - डॉ. दिलीप मानकर,
संशोधन संचालक, डॉ. पंदेकृवि,अकोला
शेतक-यांना मिळणार सूर्यफुलाचे नवे संकरित वाण!
राज्यातील घटलेले तेलबिया उत्पादन वाढविण्याकडे कृषी विद्यापीठांनी लक्ष केंद्रित केले असून, तेलबियांचे नवनवीन संकरित (हायब्रीड) बियाणे विकसित करण्यावर भर दिला जात आहे.
By admin | Updated: May 5, 2015 22:13 IST2015-05-05T22:13:08+5:302015-05-05T22:13:08+5:30
राज्यातील घटलेले तेलबिया उत्पादन वाढविण्याकडे कृषी विद्यापीठांनी लक्ष केंद्रित केले असून, तेलबियांचे नवनवीन संकरित (हायब्रीड) बियाणे विकसित करण्यावर भर दिला जात आहे.
