अकोला : विदर्भातील शेतकरी आत्महत्याग्रस्त जिल्ह्यांमध्ये अद्यापही पेरणीलायक पाऊस झालेला नाही; परंतु पुढे पाऊस येण्याच्या आशेवर शेतकऱ्यांनी पेरणीला सुरुवात केली असून, आतापर्यंत दहा लाख हेक्टरच्यावर पेरणी झाली आहे. या सर्व शेतकऱ्यांपुढे आता पीक विमा काढणे हा एकमेव पर्याय उरला आहे; पण पीक विम्याची रक्कम मिळण्यात होणारी दिरंगाई शेतकऱ्यांना अस्वस्थ करीत आहे.
राज्यात पाऊस प्रणाली विकसित झाली असून, सर्वदूर पावसाला सुरुवात झाली आहे; पण विदर्भातील अकोला, बुलडाणा व वाशिम हे तीन शेतकरी आत्महत्याग्रस्त जिल्हे मात्र अपवाद ठरले आहेत. या तीनही जिल्ह्यात आतापर्यंत केवळ सरासरी सेंटिमीटर पावसाचीच नोंद झाली आहे. दमदार पावसाच्या प्र्रतीक्षेत कंटाळलेल्या शेतकऱ्यांनी अखेर अपुऱ्या पावसातच पेरणीला सुरुवात केली आहे. पुढे पाऊस होईलच, अशी शेतकऱ्यांना अपेक्षा आहे; तथापि हवामान विभाग या भागासाठी सातत्याने ढगाळ वातावरण व हलक्या पावसाचे भाकित वर्तवित असल्याने, शेतकऱ्यांची चिंता वाढली आहे.
पावसाळ्यास प्रारंभ होण्यापूर्वीच विकत घेऊन ठेवलेले महागडे बियाणे घरी ठेवून करायचे काय, या विचारातून शेतकऱ्यांनी अखेर पेरणीसाठी तिफण बाहेर काढली आहे.
पश्चिम विदर्भात ११ जुलैपर्यंत ३२ लाख हेक्टरपैकी ६ लाख ७९ हजार ६०० हेक्टर क्षेत्रावर पेरणी आटोपली होती. त्यामध्ये यवतमाळ जिल्ह्यात सर्वाधिक ४ लाख ५२ हजार २०० हेक्टर क्षेत्रावर शेतकऱ्यांनी पेरणी केली होती. त्या खालोखाल अमरावती जिल्ह्यात ७५ हजार ४०० हेक्टर, वाशिम जिल्ह्यात ७५ हजार १०० हेक्टर, बुलडाणा जिल्ह्यात ६९ हजार ३०० हेक्टर, तर अकोला जिल्ह्यात १७ हजार ६०० हेक्टरवर पेरणी झाली होती; तथापि १५ जुलैपासून पावसाला सुरुवात झाल्याने, पेरणीची आकडेवारी दुप्पट झाली आहे. एकट्या अकोला जिल्ह्यातील शेतकऱ्यांनी ५५ हजार ९५३ क्विंटल सोयाबीन, तर ४ लाख ३३ हजार बीटी कापसाची पाकिटांची खरेदी केली आहे.
या शेतकऱ्यांनी पेरणीला सुरुवात केली असून, आता या शेतकऱ्यांना पीक विमा काढावा लागणार असल्याचे कृषी अधिकाऱ्यांचे म्हणणे आहे. दरम्यान, राष्ट्रीय पीक विमा योजनेला राज्यात यावर्षी मुदतवाढ देण्यात आली असून, पीक विमा काढण्याची अंतिम तारीख ३१ जुलै आहे.
शेतकऱ्यांना पीक विम्याची रक्कम मुदतीत मिळाली आहे. पावसाची अनिश्चितता बघून शेतकऱ्यांनी पीक विमा काढण्याची गरज आहे. पीक विमा काढण्याची मुदत ३१ जुलैपर्यंत आहे, अशी माहिती अकोल्याचे जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी प्रमोद लाहोळे यांनी दिली.
व-हाडातील शेतक-यांना आता पीक विमाच तारू शकेल!
विदर्भातील शेतकरी आत्महत्याग्रस्त जिल्ह्यांमध्ये अद्यापही पेरणीलायक पाऊस झालेला नाही
By admin | Updated: July 18, 2014 02:05 IST2014-07-18T02:05:13+5:302014-07-18T02:05:13+5:30
विदर्भातील शेतकरी आत्महत्याग्रस्त जिल्ह्यांमध्ये अद्यापही पेरणीलायक पाऊस झालेला नाही
