चालू महिन्याच्या अखेरीस अमेरिका बॉण्ड खरेदीचा कार्यक्रम थांबविण्याची शक्यता असल्याची जोरदार चर्चा सुरू झाल्याने गुंतवणूकदार आणि परकीय वित्त संस्था यांनी सावधानतेने पावले टाकण्यास प्रारंभ केला आहे. त्यामुळे गत सप्ताहात बाजारावर विक्रीचे मोठे दडपण येऊन निर्देशांक खाली आले. सलग तिसऱ्या सप्ताहात बाजारात घसरण झालेली दिसून आली.
मुंबई शेअरबाजारात गत सप्ताहात चारच दिवस व्यवहार झाले. त्यापैकी केवळ एक दिवस निर्देशांक वाढीव पातळीवर बंद झाला. सप्ताहभरामध्ये संवेदनशील निर्देशांक २६,८८८.७० ते २६,१५०.०९ या दरम्यान हेलकावे खात होता.
सप्ताहाच्या अखेरीस तो २६,२९७.३८ वर बंद झाला. सप्ताहभरात निर्देशांक १.०२ टक्के म्हणजेच २७०.६१ अंशांनी खाली आला. गेल्या तीन सप्ताहांत संवेदनशील निर्देशांकात २.९३ टक्के म्हणजेच ७९३ अंशांची घट झालेली दिसून आली.
राष्ट्रीय शेअरबाजारातही निफ्टीमध्ये अशीच घट झालेली दिसून आली. सप्ताहाच्या अखेरीस निफ्टी ७८५९.९५ अंशांवर बंद झाला. या निर्देशांकात ८५.६० अंश घसरण झाली.
अमेरिकेने सुरू केलेले बॉण्ड फेरखरेदीचे धोरण या महिन्याच्या अखेरीस थांबविले जाणार असल्याची जोरदार चर्चा शेअरबाजारात सुरू आहे. यामुळे मुख्यत: परकीय वित्त संस्थांनी सावध पवित्रा घेत विक्रीचे धोरण अंगीकारले आहे. शुक्रवारी या संस्थांनी भारतीय शेअरबाजारातून सुमारे ७२० कोटी रुपये काढून घेतले आहेत. गेल्या तीन सप्ताहात या संस्थांनी भारतीय शेअरबाजारातून ५०० दशलक्ष डॉलर म्हणजेच सुमारे तीन हजार कोटी रुपये काढून घेतले आहेत.
आंतरराष्ट्रीय नाणेनिधीने युरोपच्या आर्थिक वृद्धिदराबाबत काहीशी नाराजी दाखविली आहे. या खंडाचा आर्थिक वृद्धिदर कमी होण्याची शक्यता वर्तविण्यात आल्याने युरोपमधील सर्वच शेअरबाजार जोरदार घसरले. युरो झोनमधील सर्वात मोठी अर्थव्यवस्था असलेल्या जर्मनीच्या औद्योगिक उत्पादनाचा दर हा अतिशय कमी झाला आहे. त्यामुळे जर्मनीमध्ये आर्थिक मंदी येण्याची भीती व्यक्त होत आहे. या सर्वांचा परिणाम युरोपसह जगभरातील शेअरबाजारांवर होऊन सर्वच बाजार घसरलेले दिसून आले.
हाँगकाँगमध्ये सुरू असलेली लोकशाहीवाद्यांची निदर्शने कमी होण्याची शक्यता नाही. सरकारने त्यांच्याशी चर्चा करण्यास नकार दिल्याने आशियातील शेअरबाजारांवरही परिणाम झाला. त्याचप्रमाणे भारतातील विविध आस्थापनांचे तिमाही आर्थिक निकाल चांगले न आल्याने बाजार घसरला.
घबराटीमुळे सलग तिस-या सप्ताहातही घसरण
चालू महिन्याच्या अखेरीस अमेरिका बॉण्ड खरेदीचा कार्यक्रम थांबविण्याची शक्यता असल्याची जोरदार चर्चा सुरू झाल्याने गुंतवणूकदार आणि परकीय वित्त संस्था यांनी सावधानतेने पावले टाकण्यास प्रारंभ केला आहे
By admin | Updated: October 13, 2014 02:36 IST2014-10-13T02:36:55+5:302014-10-13T02:36:55+5:30
चालू महिन्याच्या अखेरीस अमेरिका बॉण्ड खरेदीचा कार्यक्रम थांबविण्याची शक्यता असल्याची जोरदार चर्चा सुरू झाल्याने गुंतवणूकदार आणि परकीय वित्त संस्था यांनी सावधानतेने पावले टाकण्यास प्रारंभ केला आहे
