मुंबई : मुंबई शेअरबाजाराचा निर्देशांक सलग दुसऱ्या दिवशीही घसरला आहे. सुट्या सिगारेट विकण्यावर बंदी येणार याची काळजी, तसेच जागतिक परिस्थिती यामुळे शेअर बाजार ७९ अंकानी कोसळला असून दिवसाअखेर २७,३४६.८२ अंकावर बंद झाला.
जागतिक अर्थव्यवस्थेच्या विकासात फारशी चांगली वाढ होणार नसल्याचे संकेत जागतिक बँकेने दिले, त्यामुळे मुंबई शेअर बाजारही धास्तावला. शिवाय कच्च्या तेलात घसरण झाल्यामुळेही बाजारावर परिणाम झाला. तेलाच्या किमतीतील घसरण रोखणे शक्य नाही असे ओपेकच्या दोन सदस्यांनी सांगितले, त्यामुळे तेलाच्या किंमती आणखी घसरल्या.
मुंबई शेअरबाजार आज खुला झाला तेव्हा तो २७,४३२.१४ अंकावर होता. सुरुवातीच्या काळात चांगले संकेत असल्याने निर्देशांकाने काही काळ उभारी धरली व तो २७,५१२.८० अंकापर्यंत चढला. पण त्यानंतर घसरण चालू होऊन २७,२०३.२५ अंकापर्यंत खाली आला. पण सायंकाळी काहीसा सावरत २७,३४६.८२ अंकावर बंद झाला. ही घसरण ७८.९१ अंकांची असून ०.२९ टक्के आहे. गेल्या दोन दिवसात निर्देशांक २३८.४५ अंकाने पडला आहे.
सीएनएक्स निफ्टी हा ५० शेअर्सचा बाजारही २१.८५ अंकाने खाली आला असून, ही घसरण ०.२६ टक्का आहे. ८,२७७.५५ अंकावर हा बाजार बंद झाला आहे.