- प्रसाद गो. जोशी
अमेरिका आणि चीन या जगातील दोन बलाढ्य अर्थव्यवस्थांमध्ये सुरू असलेली तू-तू मैं-मैं, भारतीय राजकारणामध्ये तेलगू देसमने केंद्र सरकारचा पाठिंबा काढल्याने निर्माण झालेली अस्वस्थता, अशा प्रमुख कारणांमुळे शेअर बाजार काहीसा नरम होता. मात्र, शुक्रवारी बाजाराला आंतरराष्ट्रीय राजकारणाचा मोठा फटका बसून बाजाराची घसरगुंडी झाली. सलग तिसऱ्या सप्ताहात निर्देशांक लाल रंगामध्ये बंद झाले.
मुंबई शेअर बाजारात सप्ताहाचा प्रारंभ आशादायक झाला. बाजाराचा संवेदनशील निर्देशांक ३३४६८.१६ असा वाढीव पातळीवर खुला झाला. त्यानंतर, सप्ताहभरामध्ये तो ३४०७७.३२ अंश ते ३३११९.९२ अंशांदरम्यान खाली वर हेलकावत होता. सप्ताहाच्या अखेरीस तो ३३१७६ अंशांवर बंद झाला. मागील सप्ताहाच्या बंद निर्देशांकाच्या तुलनेत या निर्देशांकात १३१.१४ अंशांची घट नोंदविली गेली.
राष्टÑीय शेअर बाजाराचा निर्देशांक (निफ्टी)सुद्धा खाली आला. व्यापक पायावरील या निर्देशांकामधील घसरण ३१.७० अंश अशी कमी दिसत असली, तरी टक्केवारीमध्ये ती जास्तच दिसते. सप्ताहाच्या अखेरीस निफ्टी १०१९५.१५ अंशांवर बंद झाला. बाजाराचे क्षेत्रीय निर्देशांक मिडकॅप आणि स्मॉलकॅपमध्ये मात्र वाढ झालेली दिसून आली, हे विशेष.
देशाच्या अर्थव्यवस्थेमध्ये प्रगती दिसून येत आहे. ग्राहकमूल्य निर्देशांकावर आधारित चलनवाढीचा दर ४.४ टक्के असा अपेक्षेहून कमी झाला आहे, तसेच जानेवारी महिन्यातील औद्योगिक उत्पादनाचा दर ७.५ टक्क्यांवर पोहोचला आहे. मात्र, केंद्रातील राष्टÑीय लोकशाही आघाडीमधून बाहेर पडण्याचा, तसेच मोदी सरकारविरुद्ध अविश्वास ठराव आणण्याचा तेलगू देसम पार्टीने जाहीर केलेल्या निर्णयाचा बाजारावर विपरित परिणाम झाला. अमेरिका आणि चीनमध्ये व्यापार युद्धावरून सुरू असलेला वाद, त्या विरोधात अमेरिकेने सुरू केलेली मित्रांची जमवाजमव आणि अमेरिकेच्या फेडरल रिझर्व्हची पुढील सप्ताहामध्ये होत असलेली बैठक यांचा परिणामही बाजारावर झालेला आहे.
>परकीय वित्तसंस्थांनी समभागांमध्ये
गुंतविले ६,४०० कोटी
फेब्रुवारी महिन्यात भारतीय शेअर बाजारातून मोठ्या प्रमाणावर रक्कम काढून घेणाºया परकीय वित्तसंस्थांनी मार्च महिन्याच्या पहिल्या पंधरवड्यात भारतीय समभागांमध्ये ६,४०० कोटी रुपयांची गुंतवणूक केली आहे. मात्र, या संस्थांनी कर्जरोख्यांमधून १० हजार ६०० कोटी रुपये याच कालावधीमध्ये काढून घेतले आहेत.भारतीय आस्थापनांची या तिमाहीतील कामगिरी चांगली राहण्याची अपेक्षा आणि बाजार खाली आल्याने, चांगल्या आस्थापनांचे समभाग आकर्षक किमतीला उपलब्ध असल्याने, ते खरेदी करण्याला या संस्थांनी प्राधान्य दिले आहे.आंतरराष्टÑीय बाजारात खनिजतेलाच्या किमती कमी होण्याची अपेक्षा असल्याने, त्याचा फायदा भारतीय चलनाला होण्याची अपेक्षा आहे. मात्र, अमेरिकेतील व्याजदरांमध्ये वाढ होण्याची अपेक्षा असल्याने रोख्यांमधून परकीय वित्तसंस्थांनी रक्कम मोठ्या प्रमाणात काढून घेतली आहे.
राष्ट्रीय, आंतरराष्ट्रीय चिंतांमुळे बाजाराची घसरण
अमेरिका आणि चीन या जगातील दोन बलाढ्य अर्थव्यवस्थांमध्ये सुरू असलेली तू-तू मैं-मैं, भारतीय राजकारणामध्ये तेलगू देसमने केंद्र सरकारचा पाठिंबा काढल्याने निर्माण झालेली अस्वस्थता, अशा प्रमुख कारणांमुळे शेअर बाजार काहीसा नरम होता.
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 19, 2018 01:25 IST2018-03-19T01:25:27+5:302018-03-19T01:25:27+5:30
अमेरिका आणि चीन या जगातील दोन बलाढ्य अर्थव्यवस्थांमध्ये सुरू असलेली तू-तू मैं-मैं, भारतीय राजकारणामध्ये तेलगू देसमने केंद्र सरकारचा पाठिंबा काढल्याने निर्माण झालेली अस्वस्थता, अशा प्रमुख कारणांमुळे शेअर बाजार काहीसा नरम होता.
