संसदेचे ठप्प झालेले कामकाज, जगभरातील बाजारांमध्ये असलेले मंदीचे वातावरण, भारतातील आस्थापनांचे काहीसे निराशाजनक तिमाही निकाल अशा विविध कारणांनी बाजारामध्ये निराशा दाटून राहिली असून त्याचा फटका निर्देशांकामध्ये सुमारे सव्वा टक्कयाने घट होण्यात झाला.
मुंबई शेअर बाजार हा गतसप्ताहात संमिश्र राहिला. बाजार खालीवर हेलकावे खात असल्याने निश्चित अंदाज लागत नव्हता. सप्ताहाच्या अखेरीस मुंबई शेअर बाजाराचा संवेदनशील निर्दे शांक २८११२.३१ अंशांवर बंद झाला. मागील सप्ताहाच्या बंद निर्देशांकाच्या तुलनेत त्यामध्ये ३५१ अंश म्हणजेच १.२३ टक्कयांची घट झाली. राष्ट्रीय शेअर बाजाराचा निर्देशांक (निफ्टी) ८८.३० अंश म्हणजेच १.०२ टक्कयांनी घसरून ८५२१.५५ अंशांवर बंद झाला.बाजारात परकीय वित्तसंस्थांनी मोठ्या प्रमाणावर उलाढाल केली मात्र खरेदी आणि विक्रीचा मेळ बसत नसल्याने बाजार नरमाईत राहिला.
संसदेच्या अधिवेशनाचा पहिला सप्ताह केवळ गदारोळामध्ये कोणतेही कामकाज न होता संपला. यामुळे चालू अधिवेशनामध्ये जीएसटी आणि भू सुधारणा विधेयके मंजूर होण्याचा मार्ग आता खडतर होत असल्याचे दिसू लागले आहे. यामुळे शेअर बाजारात चिंतेचे वातावरण असून त्याचा परिणाम बाजारावर विक्रीच्या दडपणामध्ये झाला. सप्ताहाच्या अखेरीस अमेरिकेतील रोजगारामध्ये वाढ होत असल्याचा जाहीर झालेला अहवाल हा बाजाराला चलाना देण्याऐवजी चिंता वाढविणारा ठरला.
अमेरिकेतील रोजगारामध्ये वाढ झाली तर फेडरल रिझर्व्हकडून लवकरच व्याजदरात वाढ केली जाण्याची शक्यता बाजारात चर्चेमध्ये आहे. यामुळे परकीय वित्तसंस्थांनी भारतासह आशियाई बाजारामध्ये गुंतवणूक करऱ्याचा वेग कमी केला आहे. परिणामी बाजारावा निराशा दाटून आलेली दिसली.
अमेरिकेतील व्याजदरात होऊ घातलेली वाढ ही सोन्याच्या दरांवरही प्रभाव टाकणारी ठरली. व्याजदरात वाढ झाल्यास सोन्यामधील गुंतवणूक फारशी प्रभावी ठरणारी नाही त्यामुळेच सोन्यातील गुंतवणूक कमी झाली. त्यातच भारतामधील लग्नसराई संपल्याने सोन्याची मागणी घटत असल्याने हे दर खूपच खाली आले.
चीनमधील वृद्धीदर कमी झाल्याने जगभरात चिंता निर्माण झाली आहे. जगातील दुसऱ्या क्रमांकाच्या या अर्थव्यवस्थेला मंदीचा तडाखा बसण्याची भीती व्यक्त होत असल्याने मुख्यत: धातू आस्थापनांच्या समभागांना मोठा तडाखा बसला. भारतीय आस्थापनांच्या निराशाजनक तिमाही निकालांचा हातभार लागला.
प्रसाद गो. जोशी
चिंतेमुळे निर्देशांकात झाली सव्वा टक्याची घट
संसदेचे ठप्प झालेले कामकाज, जगभरातील बाजारांमध्ये असलेले मंदीचे वातावरण, भारतातील आस्थापनांचे काहीसे निराशाजनक तिमाही निकाल
By admin | Updated: July 26, 2015 23:01 IST2015-07-26T23:01:20+5:302015-07-26T23:01:37+5:30
संसदेचे ठप्प झालेले कामकाज, जगभरातील बाजारांमध्ये असलेले मंदीचे वातावरण, भारतातील आस्थापनांचे काहीसे निराशाजनक तिमाही निकाल
