ऑनलाइन लोकमत
नवी दिल्ली, दि. 10- आर्थिक अडचणीत असलेल्या एअर इंडिया या कंपनीने त्यांच्या सोयीसुविधांमधून प्रवाशांना दिली जात असलेली आणखी एक सुविधा बंद करण्याचा निर्णय घेतला आहे. एअर इंडियाच्या इकॉनमी क्लासमधील प्रवाशांना दिलं जाणारं "नॉनव्हेज" जेवण" आता न देण्याचा निर्णय एअर इंडियाने घेतला आहे. त्यामुळे यापुढे एअर इंडियाच्या विमानाच्या इकॉनमी क्लासमधून देशांतर्गत प्रवास करणाऱ्या प्रवाशांना "नॉनव्हेज" पदार्थ मिळणार नाहीत. द टाइम्स ऑफ इंडियाने ही बातमी दिली आहे.
एअर इंडियाच्या विमानाने विदेशात प्रवास करणाऱ्या प्रवाशांना नॉनव्हेज जेवण मिळणार आहे. "इकॉनी क्लासमधून देशांतर्गत प्रवाशांना नॉनव्हेज जेवण न पुरविण्याचा निर्णय आम्ही दोन आठवड्यांआधी घेतला होता. या निर्णयामुळे आमच्या वार्षीक 7- 8 करोड रूपयांची बचत होऊ शकते, अशी माहिती एअर इंडियाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी दिली आहे.
एअर इंडियाचे प्रवक्ते जीपी राव म्हणाले की, नॉनव्हेज न पुरविण्याचा निर्णयामुळे अन्नाची नासधूस कमी होइल, तसंच त्यासाठी होणारा खर्चही कमी होइल आणि प्रवाशांना देण्यात येणाऱ्या खानपानाची व्यवस्था सुधारेल.
एअर इंडिया सध्या आर्थिक अडचणीत सापडली आहे तसंच एअर इंडियावर जवळपास ५५ हजार कोटी रुपये इतके कर्ज आहे. कॉस्ट कटिंग होवू नये, यासाठी कंपनीने हा निर्णय घेतला आहे. कंपनीचा तोटा वाढल्याने एअर इंडियाचे काही भाग विकण्याचा विचार केंद्र सरकारकडून सुरू आहे, त्यामुळे हा निर्णय घ्यावा लागला आहे, असं एअर इंडियाच्या वरिष्ठ अधिकाऱ्याने सांगितलं आहे.
आणखी वाचा
ओसामाचा रोबोट करतोय वेटरचे काम
उपराष्ट्रपतीपदाच्या निवडणुकीतही नितीश कुमारांची मोदींना साथ ?
मुलाखतीला सुरुवात, सेहवाग बीसीसीआयच्या कार्यालयात दाखल
याआधी एअर इंडियाने त्यांच्या आंतरराष्ट्रीय फ्लाइटमधील एका केबिन क्रूनं सुचविल्यानुसार खर्चात कपात करण्यासाठी आंतरराष्ट्रीय विमान उड्डाणातील जेवणातून सलाड बंद आणि मासिकं कमी करण्याची युक्ती आखली होती. आंतरराष्ट्रीय फ्लाइटच्या इकॉनॉमी क्लासमध्ये फक्त २०% प्रवासी जेवणात दिलेलं सलाड खातात. त्यामुळे सलाड देणं बंद केलं जाऊ शकतं. तसंच विमानात प्रत्येक प्रवाशाला एअर इंडियाच्या "शुभ यात्रा" मासिकाची एक प्रत देण्याऐवजी २५ प्रतीच मासिक रॅकमध्ये ठेवल्या गेल्या तर त्यामुळे विमानातील वजन कमी केलं जाऊ शकतं. असं निरिक्षण केबिन क्रूने नोंदविलं होतं.