भाजपा शहरातच मुक्काम ठोकून
नाशिक : जिल्हा परिषद अध्यक्षपदाच्या निवडणुकीसाठी अध्यक्ष व उपाध्यक्षपदावरून कॉँग्रेस व राष्ट्रवादीत वादंग निर्माण झालेले असतानाच, जागावाटपाच्या मुद्द्यावरून शिवसेना-भाजपामध्ये दरी वाढल्याने त्याचा परिणाम या निवडणुकीवरही दिसून येत आहे. शिवसेनेचे सदस्य सोमवारी सायंकाळी दमणला सहलीसाठी गेले, तर भाजपाच्या सदस्यांनी शहरातच मुक्काम करण्याचा निर्णय घेतला.
शिवसेनेचे गटनेते प्रवीण जाधव यांच्यासह सेनेचे सुमारे १८ सदस्य या सहलीसाठी गेल्याची चर्चा असून, उर्वरित दोन-तीन सदस्य येत्या एक- दोन दिवसांत या सदस्यांना जाऊन मिळणार असल्याची चर्चा आहे. कॉँग्रेस आणि राष्ट्रवादीत काही बेबनाव निर्माण झालाच तर त्याचा फायदा उचलण्याची तयारी शिवसेना-भाजपा युतीने केली आहे; मात्र शिवसेना- भाजपाही एकत्र असल्याचे चित्र अद्याप स्पष्ट झाले नसून सेनेचेच सदस्य सहलीला गेल्याने अद्याप काहीही आलबेल नसल्याचेच यावरून स्पष्ट होते. भाजपाच्या सदस्यांनी शहरात मुक्काम केला असला, तरी ऐनवेळी युती करून सत्ता हस्तगत करण्यासाठी काही अपक्ष व अन्य काही बंडखोर सदस्यांना जोडीला घेण्याची खेळी विरोधक खेळण्याची शक्यता आहे. मनसे आणि माकप यांचे सदस्य मात्र अद्यापही आघाडी आणि युतीतील घडणार्या घडामोडींवर लक्ष ठेवून आहेत. जिल्हा परिषदेत ऐनवेळी काहीही गणिते बदलू शकतात, असा विरोधकांना विश्वास आहे. (प्रतिनिधी)
महायुतीतही फाटाफूट; सेनेचेच सदस्य सहलीला
भाजपा शहरातच मुक्काम ठोकून
By admin | Updated: September 17, 2014 00:14 IST2014-09-16T22:07:48+5:302014-09-17T00:14:48+5:30
भाजपा शहरातच मुक्काम ठोकून
