बिष्कारावरून काँग्रेस-राष्ट्रवादीत फूट - राष्ट्रवादी पायऱ्यांवर तर काँग्रेस सभागृहात बसणार कमलेश वानखेडेनागपूर : आमदारांच्या निलंबनावरून शुक्रवारी विधानसभेत एकत्र येत सभात्याग करणाऱ्या काँग्रेस व राष्ट्रवादीत पुढील कामकाजावरील बहिष्कारावरून फूट पडली आहे. सोमवारी विधानसभेच्या कामकाजात भाग न घेता पायऱ्यांवर बसून सरकारचा बीपी वाढविण्याचा बेत राष्ट्रवादीने आखला असताना काँग्रेसने मात्र सभागृहात बसून गारपीट व अतिवृष्टीग्रस्त शेतकऱ्यांचे प्रश्न मांडण्याचा निर्णय घेतला आहे. काँग्रेसच्या या भूमिकेमुळे राष्ट्रवादीलाही जितेंद्र आव्हाड यांच्यासारख्या आक्रमक नेत्याला सभागृहात मुकावे लागणार आहे. मुंबई अधिवेशनात राज्यपालांची अवमानना केल्याच्या मुद्यावरून काँग्रेसच्या पाच आमदारांना निलंबित करण्यात आले होते. तर हिवाळी अधिवेशनात आक्षेपार्ह वक्तव्य केल्याच्या मुद्यावरून राष्ट्रवादीचे जितेंद्र आव्हाड यांनी शुक्रवारी निलंबित करण्यात आले. यावर राष्ट्रवादीचे गटनेते अजित पवार यांनी नाराजी व्यक्त करून विरोधक अधिवेशनात सहभागी होणार नाही, असे जाहीर करीत सभात्याग केला. या वेळी निलंबनाचे घाव सोसणाऱ्या काँग्रेसनेही राष्ट्रवादीला साथ दिली. सभागृहातून बाहेर पडलेले काँग्रेस- राष्ट्रवादीचे सदस्य दिवसभराचे कामकाज संपेपर्यंत पुन्हा सभागृहात परतले नव्हते. सोमवारी सबागृहाच्या कामकाजावर बहिष्कार टाकून सरकारवर दबाव निर्माण करायचा व आपल्या आमदारांचे निलंबन रद्द करून घ्यायचे, अशी रणणिती विरोधकांनी आखली होती. मात्र, काँग्रेसने वेगळी भूमिका घेतल्यामुळे आता या मुद्यावर राष्ट्रवादी एकटी पडली आहे. काँग्रेसचे पाच सदस्य निलंबित करण्यात आले तेव्हा राष्ट्रवादीकडून काँग्रेसला पाठबळ देण्यात आले नाही. त्यामुळे आता राष्ट्रवादीचे एक सदस्य निलंबित झाले म्हणून राष्ट्रवादी घेईल तीच भूमिका काँग्रेसने कशासाठी घ्यावी, असा सवाल काँग्रेस नेत्यांनी उपस्थित केला आहे. काँग्रेस सदस्यांच्या निलंबनावर निर्णय घेण्यासाठी विधानसभा अध्यक्षांच्या अध्यक्षतेखाली समिती नेमण्यात आली आहे. सोमवारी राज्यपाल नागपुरात आहे. ही समिती राज्यपालांची भेट घेऊन मार्ग काढेल, अशी अपेक्षा काँग्रेस नेत्यांनी व्यक्त केली आहे. या संबंधी विधानसभा अध्यक्षांची भेट घेऊन विनंतीही केली जाणार असल्याचेही काँग्रेस नेत्यांनी स्पष्ट केले आहे. तर, सरकारचा कारभार एकतर्फी सुरू असल्याची टीका राष्ट्रवादीचे शशिकांत शिंदे यांनी लोकमतशी बोलताना केली. दुष्काळावर दोन दिवस चर्चा घ्यायची असे ठरले असताना एका दिवसात चर्चा उरकण्यात आली. राज्यपालांच्या अभिभाषणावरही पुरेशी चर्चा होऊ दिली जात नसल्याचे चित्र आहे. निलंबनाच्या माध्यमातून विरोधकांना दबावाखाली घेऊन सरकार कामकाज उरकू पाहत आहे, असा आरोप त्यांनी केला. जितेंद्र आव्हाड हे सभागृहात बसून आपसात बोलले होते. त्यांचे बोलणे रेकॉर्डवर नव्हते. मात्र, असे असतानाही आकसापोटी निलंबनाचा निर्णय घेण्यात आला, असाही आरोप त्यांनी केला. कोट....शुक्रवारी सभागृहातील परिस्थिती पाहून काँग्रेसने राष्ट्रवादीला साथ देत सभात्याग केला होता. अधिवेशनात सहभागी न होण्याची घोषणा राष्ट्रवादीचे गटनेते अजित पवार यांनी केली होती, काँग्रेसने नाही. गारपीट व अकाळी पावसामुळे शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले आहे. शेतकऱ्यांच्या या प्रश्नाकडे लक्ष वेधण्यासाठी काँग्रेसचे सदस्य सभागृहात बसतील व सरकारला मदतीसाठी भाग पाडतील. - राधाकृष्ण विखे पाटील गटनेते काँग्रेस चौकट...विरोधी पक्षनेता ठरेना काँग्रेस-राष्ट्रवादीमध्ये विरोधी पक्षनेत्याच्या मुद्यावर मात्र अद्याप एकमत झाल्याचे दिसत नाही. काँग्रेसने संख्याबळानुसार विरोधी पक्षनेते पद देण्याची मागणी केली आहे. तर राष्ट्रवादीने माजी उपमुख्यमंत्री आर.आर. पाटील यांची नियुक्ती करावी, असे पत्र विधानसभा अध्यक्ष हरिभाऊ बागडे यांना दिले आहे. यावर अध्यक्षांनी निर्णय न दिल्यामुळे पहिला आठवडा विरोधी पक्ष नेत्याशिवाय निघाला. आता दुसऱ्या आठवड्यात तरी हा प्रश्न सुटेल की अध्यक्ष पुन्हा निर्णय प्रलंबित ठेवून विरोधकांमधील दरी आणखी वाढवतात याकडे राजकीय वर्तुळाचे लक्ष लागले आहे.
बहिष्कारावरून काँग्रेस-राष्ट्रवादीत फूट
बहिष्कारावरून काँग्रेस-राष्ट्रवादीत फूट
By admin | Updated: December 14, 2014 23:29 IST2014-12-14T23:29:50+5:302014-12-14T23:29:50+5:30
बहिष्कारावरून काँग्रेस-राष्ट्रवादीत फूट
