ऑनलाइन लोकमत
मुंबई, दि.१५ - गेल्या चार पतधोरणांपासून रेपो रेट जैसे थे ठेवणा-या रिझर्व बँकेने गुरुवारी कर्जधारकांना संक्रातीची भेट देत रेपो रेटमध्ये पाव टक्क्यांची कपात केली आहे. नवीन रेपो रेट तात्काळ लागू होणार असून रोख राखीव राखीव प्रमाण ४ टक्के असे स्थिर ठेवण्यात आले आहे.
विकासाला चालना देण्यासाठी व्याजदर कपात करण्याची गरज असल्याची भूमिका अर्थमंत्री अरुण जेटली यांनी मांडली होती. मात्र अरुण जेटलींच्या दबावापुढे नमते न घेता रिझर्व बँकेचे गव्हर्नर रघुराम राजन यांनी डिसेंबरच्या पहिल्या आठवड्यात मांडलेल्या तिमाही पतधोरणात रेपो रेटमध्ये कपात केली नव्हती. मात्र नववर्षात टप्प्याटप्प्यात रेपो रेटमध्ये घट होऊ शकते असे संकेतही रिझर्व बँकेने दिले होते.
गुरुवारी सकाळी रिझर्व बँकेने रेपो रेटमध्ये कपात करण्याचा निर्णय घेतला आहे. यानुसार ८ टक्क्यांवर असलेला रेपो रेट आता ७.७५ टक्क्यांवर आला आहे. रोख राखीव प्रमाण (कॅश रिझर्व रेशिओ) हे चार टक्क्यांवर स्थिर ठेवण्यात आले आहे. रिव्हर्स रेपो रेट ७ टक्क्यांवरुन ६.४५ टक्के ऐवढे करण्यात आले आहे. आरबीआयच्या या निर्णयामुळे बांधकाम क्षेत्रासाठी अच्छे दिन येतील असे दिसते.