Lokmat Money > बिझनेस न्यूज > कापड व्यापाऱ्यांचा बेमुदत बंद अखेर सुरू

कापड व्यापाऱ्यांचा बेमुदत बंद अखेर सुरू

कापडावर लावण्यात आलेला ५ टक्के कर मागे घेण्याच्या मागणीसाठी अहमदाबादेतील व्यापाऱ्यांनी अखेर सोमवारपासून बेमुदत बंद सुरू केला

By admin | Updated: July 12, 2017 00:03 IST2017-07-12T00:03:39+5:302017-07-12T00:03:39+5:30

कापडावर लावण्यात आलेला ५ टक्के कर मागे घेण्याच्या मागणीसाठी अहमदाबादेतील व्यापाऱ्यांनी अखेर सोमवारपासून बेमुदत बंद सुरू केला

Cloth merchants shut | कापड व्यापाऱ्यांचा बेमुदत बंद अखेर सुरू

कापड व्यापाऱ्यांचा बेमुदत बंद अखेर सुरू


अहमदाबाद : वस्तू व सेवाकर व्यवस्थेत कापडावर लावण्यात आलेला ५ टक्के कर मागे घेण्याच्या मागणीसाठी अहमदाबादेतील व्यापाऱ्यांनी अखेर सोमवारपासून बेमुदत बंद सुरू केला आहे.
अहमदाबादमधील मस्कती क्लॉथ मार्केट असोसिएशन, न्यू क्लॉथ मार्केट आणि पंचकुवा क्लॉथ मार्केट या प्रमुख तीन व्यापारी संघटनांनी हा बंद पुकारला आहे. या संघटनांच्या वतीने एक निवेदन जारी करण्यात आले आहे. केंद्र सरकारने कापडावर लावलेला ५ टक्के जीएसटी या व्यवसायातील कोणालाही स्वीकारार्ह नाही. तो मागे घेईपर्यंत व्यापाऱ्यांचे आंदोलन सुरूच राहील, असे त्यात म्हटले आहे.
सुरत येथील व्यापारी आधीच एक आठवड्यापासून संपावर आहेत. शनिवारी तेथील व्यापाऱ्यांनी भव्य निषेध रॅलीचे आयोजन केले होते. त्याला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. हजारो व्यापारी हातात फलक घेऊन घोषणा देत रॅलीत सहभागी झाले. संपूर्ण सुरत शहरात फिरलेल्या या रॅलीने ३ किलोमीटर अंतर पार करून जिल्हाधिकारी कार्यालयावर धडक दिली. हितेश संकलेचा यांनी रॅलीचे नेतृत्व केले. संकलेचा हे १ जुलैपासून उपोषणही करीत आहेत. रॅलीच्या शेवटी आंदोलकांनी सुरतेच्या जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन देऊन वस्त्र व्यापार क्षेत्रावर लावलेला ५ टक्के जीएसटी मागे घेण्याची मागणी केली.
केंद्रीय मंत्री पुरुषोत्तम रूपाला यांनी व्यापाऱ्यांना निषेधाचा मार्ग सोडून सरकारसोबत चर्चा करण्याचे आवाहन केले आहे. व्यवसायाला चालना देण्यास जीएसटी आणण्यात आला आहे. त्यामुळे व्यापाऱ्यांनी चर्चेच्या माध्यमाने समस्या सोडवाव्यात, असे रूपाला म्हणाले. (वृत्तसंस्था)
>लाखो विणकर, तंत्रज्ञ, रोजंदारी मजूर आणि कामगार बेरोजगार
बंदमुळे पॉवरलुम आणि प्रक्रिया उद्योगातील लाखो कामगार बेरोजगार झाले आहेत. कापड उद्योग हा रोजगाराच्या बाबतीत दुसऱ्या क्रमांकाचा मोठा उद्योग आहे. विणकर, तंत्रज्ञ, रोजंदारी मजूर आणि कामगार अशा विविध श्रेणींत हा उद्योग रोजगार देतो. जीएसटीअंतर्गत या व्यवसायावर विविध पातळ्यांवर कर लावण्यात आला आहे. यंत्रनिर्मित धाग्यावर १८ टक्के कर आहे. हातमागावरील धाग्यावर ५ टक्के, तर कापडावर ५ टक्के कर आहे. याशिवाय ५ टक्के सेवाकर स्वतंत्रपणे लावण्यात आला आहे.

Web Title: Cloth merchants shut

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.