Lokmat Money > बिझनेस न्यूज > स्वच्छ भारत उपकरामुळे वीज, पाणी महागले !

स्वच्छ भारत उपकरामुळे वीज, पाणी महागले !

स्वच्छ भारत मोहिमेसाठी निधी उभारण्यासाठी केंद्र सरकारने सेवा करावर आजपासून (१५ नोव्हेंबर) अर्धा टक्का उपकर लागू केल्यामुळे वीज- पाण्यासह सर्व करपात्र सेवा महाग झाल्या आहेत.

By admin | Updated: November 16, 2015 00:08 IST2015-11-16T00:08:38+5:302015-11-16T00:08:38+5:30

स्वच्छ भारत मोहिमेसाठी निधी उभारण्यासाठी केंद्र सरकारने सेवा करावर आजपासून (१५ नोव्हेंबर) अर्धा टक्का उपकर लागू केल्यामुळे वीज- पाण्यासह सर्व करपात्र सेवा महाग झाल्या आहेत.

Clean India cess, electricity, water cost! | स्वच्छ भारत उपकरामुळे वीज, पाणी महागले !

स्वच्छ भारत उपकरामुळे वीज, पाणी महागले !

नवी दिल्ली : स्वच्छ भारत मोहिमेसाठी निधी उभारण्यासाठी केंद्र सरकारने सेवा करावर आजपासून (१५ नोव्हेंबर) अर्धा टक्का उपकर लागू केल्यामुळे वीज- पाण्यासह सर्व करपात्र सेवा महाग झाल्या आहेत. सेवा कर लागू असलेल्या मोबाईल फोन, टेलिफोन, बाहेरचे जेवण, एसी रेल्वे आणि विमान प्रवास या सह सर्वच सेवांचे दर महागले आहेत. सध्या सेवा कराचा दर हा १४ टक्के असून यावर स्वच्छ भारत उपकराच्या आकारणीमुळे नवा दर १४.५ टक्के इतका झाल आहे.
उपकर आकारण्यात आल्याचा परिणाम विमान तिकिट बुक करणे, वीज- पाण्याचे बील, हॉटेलमधील वास्तव्य, रेस्टॉरंटमधील जेवण, मोबाईल रिचार्ज, आॅनलाईन पैसे हस्तांतरित करण्यासारख्या आवश्यक सेवांना महागाईची झळ बसणार
आहे.
या उपकरामुळे चालू आर्थिक वर्षाच्या उर्वरित काळात ३८०० कोटी रुपये तर संपूर्ण वर्षभरात १० हजार कोटी रुपयांचा उपकर गोळा केला जाईल, असे महसूल सचिव हसमुख अधिया यांनी स्पष्ट केले. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या कल्पनेतून साकारल्या जात असलेल्या स्वच्छ भारत मोहिमेसाठी हा पैसा खर्च केला जाईल.
रेस्टॉरंटमधील बिलावर आधी ५.६ टक्के कर आकारला जात होता, तो आता ५.८ टक्क्यांपर्यंत वाढेल. १५ नोव्हेंबरपूर्वी ज्या सेवांवरील
शुल्क भरण्यात आले किंवा २९ नोव्हेंबरपूर्वी दिल्या जाणाऱ्या बिलांसाठी नवे दर लागू नसतील असा खुलासा अर्थमंत्रालयाने केला
आहे.
करपात्र सेवांसाठी प्रत्येक शंभर रुपयामागे ५० पैसे एवढे शुल्क आकारले जाईल. मूल्य निर्धारण नियम २००६ नुसार निश्चित केल्या जाणाऱ्या मूल्याच्या हिशेबाने किंवा कमी मूल्य आकारतच त्याची मोजदाद केली जाईल. वातानुकूलित रेस्टॉरंटमधील उपकर एकूण बिलातील रकमेच्या ४० टक्क्यांवर लागेल.
एकूण बिलाच्या तुलनेत लागणारा उपकर ०.२ टक्केच असेल. अर्थमंत्री अरुण जेटली यांनी २०१५-१६ च्या अर्थसंकल्पात सर्व किंवा काही सेवांवर स्वच्छ भारत उपकर आकारण्याचा प्रस्ताव ठेवला होता. स्वच्छ भारत हा वेगळा कर राहणार नसून देश स्वच्छ करण्याच्या मोहिमेत प्रत्येक नागरिकाचा सहभाग म्हणून त्याकडे बघितले जावे, असे ते त्यावेळी म्हणाले होते.
केंद्र सरकारने २०१५-१६ च्या अर्थसंकल्पात सेवा करांतून २.०९ लाख कोटी रुपये वसूल करणे अपेक्षित मानले असून त्यात उपकराच्या रूपाने ३८०० कोटी रुपयांची भर पडणार आहे. (लोकमत न्यूज नेटवर्क)
प्रथम श्रेणी आणि एसीच्या सर्व श्रेणींचा प्रवास १५ नोव्हेंबरपासून ४.३५ टक्क्यांनी महागला असल्याचे रेल्वे मंत्रालयाने एका परिपत्रकात नमूद केले आहे. केंद्र सरकारने उपकर आकारण्याबाबत ६ नोव्हेंबर रोजी जारी केलेल्या अधिसूचनेनुसार वातानुकूलित प्रवासाचे भाडे वाढविण्यात येत असल्याचे रेल्वेने एका परिपत्रकात नमूद केले आहे. १५ नोव्हेंबरपूर्वी खरेदी केलेल्या तिकिटांसाठी नवा दर लागू झालेला नसेल. सामान्य आणि शयनयान (स्लीपर कोच) श्रेणीच्या प्रवासभाड्यात कोणताही बदल केलेला नाही.नवी दिल्ली - मुंबई वातानुकूलित प्रवास २०६ तर नवी दिल्ली ते हावडादरम्यानचे एसी-३ चे दर १०२ रुपयांनी महागले आहे. दिल्ली- चेन्नई वातानुकूलित प्रवास साधारणपणे १४० रुपयांनी महागणार आहे. उपकरातून रेल्वे वार्षिक एक हजार कोटी रुपयांची कमाई करणार आहे.
पूर्वी १०६ रुपये खर्च येऊन बनविले जाणाऱ्या पॅनकार्डाच्या किमतीमध्येही एक रुपया वाढ होत ही किंमत आता १०७ रुपये झाली आहे. तर, विदेशात पाठविल्या जाणाऱ्या पॅनकार्डचे दर चार रुपयांनी वाढविण्यात आले आहेत. त्यासाठी आधी ९८५ रुपये लागायचे आता कुरिअर शुल्क धरून ९८९ रुपये लागतील. यापूर्वी यावर्षी जूनमध्ये पॅन कार्ड एक रुपयाने महागले होते. अधिकाधिक करदात्यांपर्यंत पॅनकार्ड पोहोचविण्याची सरकारने मोहीम आखली आहे.

Web Title: Clean India cess, electricity, water cost!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.