ऑनलाइन लोकमत
बीजिंग, दि. २५ - चीनमधील आर्थिक मंदीचा तडाखा मंगळवारीही बसण्याची चिन्हे असून मंगळवारी सकाळी चीन व जपानमधील शेअर बाजारात घसरण झाल्याने याचा परिणाम भारतीय शेअर बाजारावरही होताना दिसत आहे. सकाळी शेअर बाजार वाढीने उघडला असला तरी दुपारनंतर सेन्सेक्समध्ये ३०० अंकांची घसरण झाली आहे.
चीनचे चलन युआनचे अवमुल्यन व जगातील दुस-या क्रमांकाची अर्थव्यवस्था असलेल्या चीनमध्ये आर्थिक मंदीचा शिरकाव यामुळे सोमवारी भारतासह जगभरातील शेअर बाजाराने घसरणीच्या तांडवाची अनुभूती घेतली होती. मंगळवारीदेखील चिनी ड्रॅगनने जगभराला दणका दिला असून मंगळवारी चीनचा शेअर बाजार सुरु होताच निर्देशांकात सहा टक्क्यांची घसरण झाली. काही वेळाने चिनी शेअर बाजार सावरला आहे. तर दुसरीकडे जपानमधील निर्देशांक निक्कीतही ३.८ टक्क्यांची घसरण झाली.
एकीकडे जागतिक स्तरावर शेअर बाजारात घसरण झाली असतानाच दुसरीकडे मंगळवारी भारतीय शेअर बाजार वधारला. मंगळवारी शेअर बाजार सुरु होताच सेन्सेक्स ३५० अंकांनी तर निफ्टीत सुमारे १०० अंकांनी वाढ झाली. दुपारनंतर शेअर बाजारात पुन्हा घसरण बघायला मिळाली. सेन्सेक्स ३०० तर निफ्टीत ८० अंकांनी घसरण झाली आहे.