Lokmat Money > बिझनेस न्यूज > साखर कारखानदारांशी केंद्र सरकार चर्चा करणार

साखर कारखानदारांशी केंद्र सरकार चर्चा करणार

: उत्तर प्रदेशातील उसाच्या चढ्या दरामुळे राज्यातील साखर कारखानदारांनी यंदा गाळप बंद करण्याची धमकी दिली आहे.

By admin | Updated: August 12, 2014 03:23 IST2014-08-12T03:23:11+5:302014-08-12T03:23:11+5:30

: उत्तर प्रदेशातील उसाच्या चढ्या दरामुळे राज्यातील साखर कारखानदारांनी यंदा गाळप बंद करण्याची धमकी दिली आहे.

The Central Government will discuss the sugar factories | साखर कारखानदारांशी केंद्र सरकार चर्चा करणार

साखर कारखानदारांशी केंद्र सरकार चर्चा करणार

नवी दिल्ली : उत्तर प्रदेशातील उसाच्या चढ्या दरामुळे राज्यातील साखर कारखानदारांनी यंदा गाळप बंद करण्याची धमकी दिली आहे. यावर तोडगा काढण्याच्या दृष्टीने केंद्र सरकार येत्या १४ आॅगस्ट रोजी कारखानदारांशी चर्चा करणार आहे. यावेळी अन्य राज्यांसह महाराष्ट्राचे साखर आयुक्तही उपस्थित राहतील.
केंद्रीय अन्नमंत्री रामविलास पासवान यांनी सांगितले की, साखर कारखानदारांची राज्य सरकारबाबत तक्रार आहे. मात्र, यावर तोडगा काढण्यासाठी आम्ही येत्या गुरुवारी या मुद्यावर बैठक बोलावली आहे. आम्ही केवळ मध्यस्थ म्हणून भूमिका निभावणार आहोत. शेतकरी आणि साखर कारखानदार या दोघांच्या हितांचे रक्षण व्हावे, असे आम्हाला वाटते.
उत्तर प्रदेशातील ऊस उत्पादक शेतकऱ्यांना कारखानदारांकडून गेल्या वर्षीचे अजूनही ७,००० कोटी रुपयांचे देणे मिळणे बाकी आहे. यामुळे राज्यातील शेतकऱ्यांमध्ये मोठी नाराजी आहे. साखर कारखानदार शेतकऱ्यांची देणी वेळेत चुकती करतात किंवा नाही यावर नियंत्रण ठेवण्याचा अधिकार राज्य सरकारला आहे.
रोखीच्या समस्येचा सामना करणाऱ्या उत्तर प्रदेशातील साखर कारखानदारांनी राज्य सरकारला मनमानी पद्धतीने केलेली ऊस दरवाढ न रोखून साखर उत्पादनाशी याचा मेळ न घातल्यास यंदा गाळप न करण्याची धमकी दिली आहे. केंद्र सरकारने यंदा उसाला प्रतिक्विंटल २१० रुपये भाव दिला आहे; मात्र उत्तर प्रदेश सरकारने यात वाढ करून तो प्रतिक्विंटल २८० रुपये केला आहे. याबद्दल राज्यात मोठे मतभेद निर्माण झाले आहेत. (लोकमत न्यूज नेटवर्क)

Web Title: The Central Government will discuss the sugar factories

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.