प्रसाद गो. जोशी
सप्ताहाच्या पूर्वार्धामुळे झालेल्या मोठ्या विक्रीने गेल्या दोन सप्ताहांपासूनचे अस्वलाचे साम्राज्य कायम राहण्याची शक्यता दिसत असतानाच अचानक बैलाने बाजारात प्रवेश केला आणि गेल्या दोन सप्ताहांची घसरण थांबली. सप्ताहाच्या अखेरीस निर्देशांकामध्ये झालेली किरकोळ वाढ हा गुंतवणूकदारांना दिलासा देणारी ठरली आहे.
मुंबई शेअर बाजारामध्ये गतसप्ताह हा अतिशय अस्थिर राहिला. सप्ताहादरम्यान बाजाराचा संवेदनशील निर्देशांक १२०० अंशांदरम्यान खाली- वर होताना दिसून आला. सप्ताहाच्या अखेरीस संवेदनशील निर्देशांक २७१०५.३९ अंशांवर बंद झाला. मागील सप्ताहाच्या बंद निर्देशांकाच्या तुलनेत त्यामध्ये ०.०३ टक्के म्हणजेच ९४ अंशांची वाढ झालेली दिसून आली. राष्ट्रीय शेअर बाजारातही सप्ताहाच्या उत्तरार्धात आलेल्या तेजीमुळे निफ्टी हा निर्देशांक हिरव्या रंगामध्ये बंद होऊ शकला. मागील सप्ताहापेक्षा अवघे १० अंश वाढून हा निर्देशांक ८१९७ अंशांवर बंद झाला. मिडकॅप आणि स्मॉलकॅप या क्षेत्रीय निर्देशांकांमध्ये मात्र घसरण कायमच आहे. हे दोन्ही निर्देशांक अनुक्रमे १.७ आणि एक टक्क्याने खाली आले आहेत.
गतसप्ताहाच्या प्रारंभी जगभरातील शेअर बाजारांमध्ये वित्तसंस्थांनी मोठ्या प्रमाणावर बॉण्डची विक्री केल्याने सर्वच बाजार खाली आले होते. अन्य बाजारांमध्ये नंतर परिस्थिती सुधारली असली तरी भारतीय बाजार मंदीच्या सावटाखालीच होते. परकीय वित्तसंस्थांना करासाठी दिलेल्या नोटिसांनंतर याबाबत कोणताही तोडगा निघालेला नसल्याने या संस्था खरेदीपासून तशा दूरच होत्या. सप्ताहाच्या उत्तरार्धात याबाबतचा तोडगा निघणे दृष्टिपथात आल्याने या संस्थांनी बाजारात खरेदी करण्यास प्रारंभ केला आणि बाजार वर गेला.
सप्ताहाच्या अखेरच्या सत्रामध्ये लोकसभेने जीएसटी विधेयकाला मंजुरी दिली असून, पुढील सप्ताहात राज्यसभेपुढे हे विधेयक येणार आहे. त्याचबरोबर भूमी संपादन विधेयक वादाच्या भोवऱ्यात सापडले असल्याने त्याबाबतची अनिश्चितता कायम आहे. या सर्व बाबी बाजाराच्या अस्थिरतेला हातभार लावत आहेत. विविध आस्थापनांचे चौथ्या तिमाहीचे येत असलेले निकालही बाजारावर अनुकूल अथवा प्रतिकूल परिणाम करीत आहेत.
परकीय वित्तसंस्थांकडून भारतीय आस्थापनांच्या समभागांपेक्षा चिनी समभागांना अधिक प्रमाणात पसंती मिळत असून, त्यांची खरेदी मोठ्या प्रमाणावर होत आहे. परिणामी भारतीय शेअर बाजारातील या संस्थांची खरेदी कमी झाल्याने बाजाराला मंदीचा तडाखा बसत आहे.
अस्वलाच्या राज्यात बैलाने मारली मुसंडी
दोन सप्ताहांपासूनचे अस्वलाचे साम्राज्य कायम राहण्याची शक्यता दिसत असतानाच अचानक बैलाने बाजारात प्रवेश केला आणि गेल्या दोन सप्ताहांची घसरण थांबली.
By admin | Updated: May 10, 2015 22:48 IST2015-05-10T22:48:03+5:302015-05-10T22:48:03+5:30
दोन सप्ताहांपासूनचे अस्वलाचे साम्राज्य कायम राहण्याची शक्यता दिसत असतानाच अचानक बैलाने बाजारात प्रवेश केला आणि गेल्या दोन सप्ताहांची घसरण थांबली.
