नवी दिल्ली : युक्रेनमधील युद्धग्रस्त स्थितीच्या पार्श्वभूमीवर जागतिक पातळीवर गुंतवणूकदारांनी सुरक्षित गुंतवणूक म्हणून सोन्याला पसंती दिल्यामुळे शुक्रवारी सोन्याचे भाव चढले. चांदीच्या भावातही वाढ झाली.
राजधानी दिल्लीतील सराफा बाजारात सोने १५0 रुपयांनी वाढले. त्याबरोबर या मौल्यवान धातूची किंमत २८,५00 रुपये प्रति १0 ग्राम झाली. औद्योगिक क्षेत्रातून असलेल्या मागणीत वाढ झाल्याने, तसेच शिक्के निर्मात्यांकडूनही मागणी वाढल्याने चांदीच्या भावात तेजी पाहायला मिळाली. दिल्लीच्या सराफा बाजारात चांदीचा भाव किलोमागे तब्बल ५00 रुपयांनी वाढला. त्याबरोबर चांदी ४५,५00 रुपये किलो झाली.
सराफा व्यापाऱ्यांनी सांगितले की, युक्रेनमध्ये बंडखोरांनी मलेशियाचे एक प्रवासी विमान पाडले. तेथील परिस्थिती आणखी विकोपाला जाण्याची भीती व्यक्त होत आहे. असे झाल्यास युरोप आणि आशियावर अस्थैर्याचे ढग निर्माण होण्याचा धोका आहे. अस्थीर वातावरणात सोन्यातील गुंतवणूक कधीही सर्वाधिक सुरक्षित समजली जाते. त्यामुळे गुंतवणूकदार सराफा बाजारात परतले आहेत. सोन्यात तेजी येणार असा अंदाज बांधून दागिने निर्माते आणि रिटेल विक्रेते यांनीही जोरदार खरेदी केली. या सर्वांचा एकत्रित परिणाम होऊन सराफा बाजारात तेजी पाहायला मिळाली.
जगभरातील सोन्या-चांदीच्या किमतीचा कल ठरविणाऱ्या न्यूयॉर्कच्या सोने बाजारात सोन्याचा भाव १.४२ टक्क्यांनी वाढून १,३१८.२0 डॉलर प्रतिऔंस झाला आहे. त्याचबरोबर चांदीचा भाव १.७६ टक्क्यांनी वाढून २१.१६ डॉलर प्रतिऔंस झाला आहे.
दिल्लीतील सराफा बाजारात ९९.९ टक्के शुद्धता, तसेच ९९.५ टक्के शुद्धता असलेल्या सोन्याचा भाव १५0 रुपयांनी वाढून अनुक्रमे २८,५00 रुपये आणि २८,३00 रुपये तोळा झाला. काल तो १७५ रुपयांनी वाढला होता. सोन्याच्या आठ ग्रॅमच्या गिन्नीचा भाव १00 रुपयांनी वाढून २४,९00 रुपये झाला आहे.
तयार चांदीच्या भावात ५00 रुपयांची वाढ झाल्यानंतर हा धातू ४५,५00 रुपये किलो झाला. साप्ताहिक डिलिव्हरीच्या चांदीचा भाव ४0५ रुपयांनी वाढून ४५,३४0 रुपये किलो झाला. काल चांदीचा भाव १५0 रुपयांनी वाढला होता.
चांदीच्या शिक्क्यांचा भाव मात्र स्थिर राहिला. हे भाव खरेदीसाठी ८0 हजार रुपये, तर विक्रीसाठी ८१ हजार रुपये शेकडा होते.
सलग दोन दिवसांच्या तेजीमुळे सराफा बाजारात उत्साहाचे वातावरण दिसून आले. तेजी स्वत:च तेजीला गती देत असते. तेजीमुळे सामान्य खरेदीदारही बाजाराकडे वळतात. (लोकमत न्यूज नेटवर्क)
सराफा बाजारात तेजी परतली; भाव वाढले
युक्रेनमधील युद्धग्रस्त स्थितीच्या पार्श्वभूमीवर जागतिक पातळीवर गुंतवणूकदारांनी सुरक्षित गुंतवणूक म्हणून सोन्याला पसंती दिल्यामुळे शुक्रवारी सोन्याचे भाव चढले.
By admin | Updated: July 19, 2014 00:08 IST2014-07-18T23:35:21+5:302014-07-19T00:08:30+5:30
युक्रेनमधील युद्धग्रस्त स्थितीच्या पार्श्वभूमीवर जागतिक पातळीवर गुंतवणूकदारांनी सुरक्षित गुंतवणूक म्हणून सोन्याला पसंती दिल्यामुळे शुक्रवारी सोन्याचे भाव चढले.
