मुंबई : अर्थमंत्री अरुण जेटली यांनी दागिन्यांवर १ टक्का अबकारी कर लावण्याचा प्रस्ताव अर्थसंकल्पात ठेवल्यामुळे इंडियन बुलियन अँड ज्वेलर्स असोसिएशनने तीव्र नाराजी व्यक्त करतानाच मंगळवारपासून देशव्यापी बेमुदत संप सुरू केला आहे. या संदर्भात केंद्रीय वित्तमंत्र्यांची लवकरच भेट घेऊन त्यांना ही कर आकारणी रद्द करण्याची मागणी करण्यात येणार आहे. मात्र, तोवर हा संप सुरूच राहणार असल्याची माहिती आयबीजेएचे पदाधिकारी केतन श्रॉफ यांनी दिली.
अर्थमंत्री अरुण जेटली यांनी आपल्या भाषणात दागिन्यांवरील कराचा उल्लेख केला. इनपूट क्रेडिटसह १ टक्का अबकारी कर दागिन्यांवर लावण्यात येणार आहे. इनपूट क्रेडिटविना हा कर १२.५ टक्के होईल, असे जेटली यांनी सांगितले. इंडियन बुलियन अँड ज्वेलर्स असोसिएशनने एक तातडीचे निवेदन जारी करून या कराला विरोध केला. निवेदनात म्हटले की, अबकारी कर सराफा उद्योगासाठी प्रचंड अडचणीचा ठरणार आहे. खरे म्हणजे हा उद्योग आधीच संकटाचा सामना करीत आहे. अबकारी कर लावल्यानंतर या संकटांत वाढ होईल. या क्षेत्रात तब्बल १ कोटी कारागीर काम करतात. नव्या करानंतर त्यातील बहुतांश लोक बेकार होतील.