Lokmat Money > बिझनेस न्यूज > निधीच्या पळवापळवीने सदस्यांचे खवळले पित्त

निधीच्या पळवापळवीने सदस्यांचे खवळले पित्त

कोठे शून्य, तर कोठे कोट्यवधींची खैरात; सदस्य अनभिज्ञ

By admin | Updated: September 1, 2014 21:34 IST2014-09-01T21:34:05+5:302014-09-01T21:34:05+5:30

कोठे शून्य, तर कोठे कोट्यवधींची खैरात; सदस्य अनभिज्ञ

Bile of the members | निधीच्या पळवापळवीने सदस्यांचे खवळले पित्त

निधीच्या पळवापळवीने सदस्यांचे खवळले पित्त

ठे शून्य, तर कोठे कोट्यवधींची खैरात; सदस्य अनभिज्ञ
नाशिक : जिल्हा परिषदेच्या सेसच्या निधी नियोजनावरून आता सत्ताधार्‍यांमध्येच सुप्त संघर्ष उघड-उघड होण्याची चिन्हे असून, एका राष्ट्रवादी सदस्याच्या गटात वितरणात दर्शविण्यात आलेल्या रकमेची तफावत अन् दुसर्‍या सदस्याच्या गटात चक्क शून्य निधीचे नियोजन पाहून सत्ताधारी संघर्षात नाराजी वर्तविण्यात येत आहे.
उपाध्यक्ष संपतराव सकाळे यांनी बांधकाम विभागाचे कार्यकारी अभियंता सुरेंद्र कंकरेज यांच्याकडून त्यांच्या विभागाकडील नियोजनाची आकडेवारी मागितली असता, या निधी वितरणाची आकडेवारी पाहून अनेक सदस्यांचे डोळे पांढरे होण्याची वेळ आली आहे. भाजपा गटनेते केदा अहेर यांच्या लोहोणेर गटात चक्क ९९ लाख ६५ हजारांचा निधी एकट्या बांधकामांसाठी धरण्यात आल्याचे समजते, तर राष्ट्रवादीचे यतिन पगार यांच्या जायखेडा गटात सर्वाधिक १ कोटी ४१ लाखांच्या निधीची तरतूद करण्यात आली आहे. त्यामानाने राष्ट्रवादीच्या लोकसभेच्या उमेदवार व उमराणे गटाच्या जिल्हा परिषद सदस्य डॉ. भारती पवार यांना नियोजनात भोपळा धरण्यात आल्याचे कळते. मात्र हा निधी बागलाण गटात वर्ग करण्यात आल्याचा युक्तिवाद बागलाण गटातील एका सदस्याने केला असून, डॉ. भारती पवार यांनी मात्र आपल्या गटातच निधी खर्च करण्यात येणार असल्याचे स्पष्ट केले आहे. विशेष म्हणजे माजी बांधकाम समिती सभापती रवींद्र देवरे यांच्या कळवण (बु.) गटात ४७ लाख ४८ हजारांच्या निधीचे नियोजन दर्शविण्यात आलेले असले तरी प्रत्यक्षात रवींद्र देवरे यांनी आपल्या गटात अवघ्या १५ लाखांच्या कामांना मंजुरी मिळाली असून, मग उर्वरित ३२ लाखांचा निधी नेमका गेला कुठे? याची माहिती बांधकाम विभागाला विचारली आहे. इतकेच नव्हे तर सुरगाणा तालुक्यातील सुभाष चौधरी यांच्या भवाडा, प्रशांत देवरे यांच्या सुरगाणा गटातही निधी नियोजनात भोपळा आल्याचे या तक्त्यात दर्शविण्यात आले आहे. बागलाणमधीलच सिंधूताई सोनवणे यांच्या पठावे दिगर गटात ४८ लाख ९७ हजार तर, डॉ. प्रशांत सोनवणे यांच्या ताहाराबाद गटात ४३ लाख ९७ हजार निधीची तरतूद दर्शविण्यात आली आहे. या निधीच्या नियोजनामुळे काही सत्ताधारी सदस्यात नाराजी असून, विरोधी सदस्य मात्र अद्याप या विषयाबाबत अनभिज्ञ असल्याचे समजते.(प्रतिनिधी)

Web Title: Bile of the members

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.