शेअर बाजारात गडगडाट : सेन्सेक्स ८५५ अंकांनी खाली; निफ्टीही २५१ अंकांनी घसरला; दोन्ही बाजार दोन आठवड्यांच्या नीचांकावर
मुंबई : मंगळवारी शेअर बाजारात साडेपाच वर्षांतील सर्वांत मोठी घसरण झाली. मुंबई शेअर बाजार ८५५ अंकांनी कोसळून २७ हजार अंकांच्या खाली गेला. राष्ट्रीय शेअर बाजाराचा सीएनएक्स निफ्टी २५१ अंकांनी खाली आला. ग्रीस युरो झोनमधून बाहेर पडणार असल्याच्या बातम्या आणि ५0 डॉलरच्या खाली आलेल्या कच्च्या तेलाच्या किमती यामुळे जगातील सर्वच शेअर बाजारांत घसरणीचा गडगडाट पाहायला मिळाला.
या घसरणीबरोबर भारताचे दोन्ही प्रमुख शेअर बाजार दोन आठवड्यांच्या नीचांकी पातळीवर पोहोचले आहेत. या एका दिवसातील घसरणीने गुंतवणूकदारांचे ३ दशखर्व रुपये बुडाले आहेत. आंतरराष्ट्रीय बाजारात मंगळवारी कच्च्या तेलाच्या किमती ५ वर्षांत प्रथमच ५0 डॉलर प्रतिबॅरलच्या खाली आल्या आहेत. आर्थिक वाढीची गती धीमी होण्याची भीती त्यातून निर्माण झाली आहे. याचा परिणाम शेअर बाजारांवर झाला.
३0 कंपन्यांचा समावेश असलेला सेन्सेक्स सकाळी मंदीनेच उघडला. नंतर तो घसरतच राहिला. हळहळू तो २७ हजार अंकांच्या खाली घसरला. एका क्षणी तो २६,९३७.0६ अंकांपर्यंत खाली गेला होता. सत्रअखेरीस ८५४.८६ अंकांची अथवा ३.0७ टक्क्यांची घसरण नोंदवून तो २६,९८७.४६ अंकांवर बंद झाला. ६ जुलै २00९ रोजी सेन्सेक्स ८६९.६५ अंकांनी कोसळला होता. त्यानंतरची ही सर्वांत मोठी घसरण आहे.
सेन्सेक्समध्ये समावेश असलेल्या ३0 कंपन्यांपैकी २९ कंपन्यांचे समभाग कोसळले. यावरून आजच्या गडगडाटाची कल्पना यायला हवी. ओएनजीसीला सर्वाधिक ६ टक्के घसरण सोसावी लागली. सेन्सेक्समधील एकमेव एचयूएल कंपनीचेच समभाग वाढले. बीएसई स्मॉल-कॅप आणि मीड-कॅप निर्देशांक २.९५ टक्क्यांच्या खाली आले.
५0 कंपन्यांच्या व्यापक आधारावरील एनएसई निफ्टी २५१.0५ अंकांनी अथवा ३.00 टक्क्यांनी कोसळला. ८,१२७.३५ अंकांवर तो बंद झाला. ग्रीसमध्ये या महिन्याच्या अखेरीस निवडणुका होत आहेत. या निवडणुकीत काटकसरविरोधी सिरिझा पक्षाला सत्ता मिळण्याची शक्यता आहे. सध्या हा पक्ष विरोधी पक्षात आहे. सिरिझा पक्ष सत्तेवर आल्यास ग्रीस युरोझोनमधून बाहेर पडू शकतो, अशी भीती व्यक्त होत आहे. असे झाल्यास ग्रीसमधील आर्थिक सुधारणांना खीळ बसेल. याचा फटका संपूर्ण युरोपला सहन करावा लागेल. या पार्श्वभूमीवर शेअर बाजारात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. जपानच्या निक्कीच्या नेतृत्वाखालील आशियाई शेअर बाजार आपटले आहेत. त्या आधी काल न्यूयॉर्कच्या शेअर बाजारात घसरण झाली होती. युरोपीय बाजारही घसरणीला लागले आहेत. मुंबई शेअर बाजारातील हंगामी आकडेवारीनुसार, विदेशी गुंतवणूकदारांनी काल ४७२ कोटी रुपयांची शेअर खरेदी केली.
४बाजाराची एकूण व्याप्ती नकारात्मक राहिली. २,२५३ कंपन्यांचे समभाग घसरले. ६४४ कंपन्यांचे समभाग वाढले. ५८ कंपन्यांचे समभाग स्थिर राहिले. बाजाराची एकूण उलाढाल मात्र वाढून ३,१३९.१५ कोटी झाली. आदल्या दिवशी ती २,७२९.१७ कोटी होती.
४जपान, हाँगकाँग, सिंगापूर, तैवान, सिंगापूर आणि दक्षिण कोरिया येथील शेअर बाजार 0.३२ टक्के ते 0.९९ टक्के घसरले. एकटा शांघायचा कंपोझिट या घसरणीतून वाचला. त्याने 0.0३ टक्क्यांची वाढ नोंदविली आहे. फ्रान्स, जर्मनी आणि ब्रिटन येथील शेअर बाजार सकाळच्या सत्रात 0.२४ टक्के ते १.१३ टक्के घसरण दर्शवीत होते.
४सर्वाधिक घसरण सोसाव्या लागणाऱ्या सेन्सेक्समधील कंपन्यांत आयसीआयसीआय बँक, एसबीआय, टाटा पॉवर, टीसीएस, अॅक्सिस बँक, हीरो मोटोकॉर्प, लार्सन अँड टुब्रो, गेल, एनटीपीसी यांचा समावेश आहे.