ऑनलाइन लोकमत -
सिलिकॉन व्हॅली, दि. २२ - अॅपलने आपला सर्वात स्वस्त 'आयफोन SE' अखेर लॉन्च केला आहे. गेल्या अनेक दिवसांपासून या फोनची चर्चा सुरु होती. अॅपलचे सीईओ टीम कूक यांच्या उपस्थितीत आयफोन SE लॉन्च करण्यात आला. या आयफोनची किंमत 39 हजार रुपये असणार असल्याची माहिती अॅपलने दिली आहे. भारतामध्ये एप्रिल महिन्यात फोन उपलब्ध होणार आहे. मे महिन्याच्या अखेरपर्यंत जगातील 110 देशांमध्ये आयफोन SE उपलब्ध करुन दिला जाणार आहे.
आयफोन SE चा डिस्प्ले 4 इंचाचा असणार आहे. तसंच 16 जीबी आणि 64 जीबी व्हेरिएंटमध्ये हा फोन उपलब्ध असणार आहे. आयफोन SE सोबत आयपॅड प्रो आणि आयवॉचचे चार नव्या रंगातील व्हेरिएंटही लाँच करण्यात आले.
ज्यांना छोट्या स्क्रीनचा तसंच स्वस्त आयफोन हवा आहे त्यांच्यासाठी आयफोन SE आणल्याचं कंपनीने सांगितलं आहे. आयफोन SE ची आतील बॉडी ही आयफोन 6S सारखी ठेवण्यात आली आहे. आयफोन SE चा लूक आयफोन 5Sसारखाचं असून आयफोन 6S एवढी बॅटरी क्षमता असणार आहे.
आयफोन SE मधील फिचर्स -
A9 प्रोसेसर
M9मोशन प्रोसेसर
12 मेगापिक्सेल कॅमेरा
4k व्हिडीओ क्षमता
4.2 ब्लूट्यूथ
सुधारित वाय - फाय आणि एलटीई सुविधा
टच आयडी फिंगरप्रिंट सेन्सर सुविधा
नवे मायक्रोफोन्स