>ऑनलाइन लोकमत
न्यूयॉर्क, दि. 21 - अब्जाधीशांच्या संख्येच्या यादीत भारत चौथ्या क्रमांकावर पोहोचला आहे. भारतात एकूण 100 हून अधिक अब्जाधीश असून रिलायन्स इंडस्ट्रीजचे मुकेश अंबानी या यादीमध्ये पहिल्या स्थानावर आहेत. फोर्ब्स मॅगजीनने जारी केलेल्या नव्या यादीत ही माहिती समोर आली आहे. फोर्ब्सने जारी केलेल्या जगभरातील अब्जाधीशांच्या यादीत एकूण 2,043 श्रीमंतांनी स्थान मिळवलं आहे. या सर्वांची एकूण संपत्ती गतवर्षीच्या तुलनेत 18 टक्क्यांनी वाढली आहे.
बिल गेट्स गेल्या 23 वर्षांत 18 वेळा जगातील सर्वात श्रीमंत व्यक्ती ठरले आहेत. गेट्स यांची संपत्ती 86 अरब डॉलर आहे. गतवर्षी त्यांची संपत्ती 75 अरब डॉलर होती. त्यांच्यानंतर बर्कशायर हॅथवेचे प्रमुख वारेन बफे यांचा क्रमांक आहे. त्यांची संपत्ती 75.6 अरब डॉलर इतकी आहे. अॅमेझॉनच्या जेफ बेजोस यांच्या संपत्तीत 27.6 अरब डॉलरची वाढ झाली आहे. 72.8 अरब डॉलर्सच्या संपत्तीसह ते तिस-या स्थानावर पोहोचले आहेत. पहिल्या तीनमध्ये स्थान मिळवण्याची ही त्यांची पहिलीच वेळ आहे. याआधी ते पाचव्या क्रमांकावर होते.
जगभरातील भारतीय वंशाच्या एकूण 20 जणांनी या यादीत स्थान मिळवलं आहे. यामध्ये सर्वात वरती आहेत ब्रिटनमध्ये राहणारे भारतीय वंशाचे हिंदुजा बंधू. अब्जाधीशांच्या यादीत त्यांचा 64 वा क्रमांक आहे. त्यांची संपत्ती 15.4 अरब डॉलर आहे.
मुकेश अंबानी भारतीय अब्जाधीशांच्या यादीत अव्वल आहेत. 23.2 अरब डॉलर्सच्या संपत्तीसह ते 33 व्या स्थानावर आहेत. फोर्ब्स मॅगझीनने यावेळी मुकेश अंबानींचं कौतुक करताना त्यांनी भारतात टेलिकॉम मार्केटमध्ये चांगलीच स्पर्धा निर्माण केल्याचं म्हटलं आहे. मुकेश अंबानी यांची टेलिकॉम कंपनी रिलायन्स जिओने गतवर्षी सप्टेंबर महिन्यात भारतात 4G सेवा देण्यास सुरुवात केली आहे. मुकेश अंबानींचे छोटे बंधू अनिल अंबानी या यादीमध्ये 745 व्या स्थानावर आहेत. त्यांची एकूण संपत्ती 2.7 अरब डॉलर इतकी आहे.
अब्जाधीशांच्या या यादीत केवळ चार भारतीय महिलांचा समावेश आहे. यामध्ये सर्वात वरती सावित्री जिंदल यांचं नाव आहे. 5.2 अरब डॉलर्सच्या संपत्तीसह अब्जाधीशांच्या यादीत त्यांनी 303 वं स्थान मिळवलं आहे. गोदरेज समूहाच्या स्मिता कृष्णा गोदरेज 814 व्या स्थानी असून बायोकॉनच्या किरण मजूमदार 973 व्या स्थानी आहे. युएसव्ही इंडियाच्या चेअरपर्सन लिना तिवारी या यादीमध्ये 1,030 व्या स्थानावर आहेत.