Daily Top 2Weekly Top 5
Lokmat Money > बिझनेस न्यूज > अदानींच्या आॅस्ट्रेलियातील कोळसा खाणीची पर्यावरण मंजुरी रद्द

अदानींच्या आॅस्ट्रेलियातील कोळसा खाणीची पर्यावरण मंजुरी रद्द

क्वीन्सलँड राज्यात जगातील सर्वात मोठी कारमायकेल कोळसा खाण सुरू करण्यास भारतातील अदानी उद्योग समूहास आॅस्ट्रेलियाच्या सरकारने दिलेली

By admin | Updated: August 5, 2015 22:51 IST2015-08-05T22:51:14+5:302015-08-05T22:51:14+5:30

क्वीन्सलँड राज्यात जगातील सर्वात मोठी कारमायकेल कोळसा खाण सुरू करण्यास भारतातील अदानी उद्योग समूहास आॅस्ट्रेलियाच्या सरकारने दिलेली

Adani's environmental clearance to Australia's coal mines canceled | अदानींच्या आॅस्ट्रेलियातील कोळसा खाणीची पर्यावरण मंजुरी रद्द

अदानींच्या आॅस्ट्रेलियातील कोळसा खाणीची पर्यावरण मंजुरी रद्द

मेलबर्न : क्वीन्सलँड राज्यात जगातील सर्वात मोठी कारमायकेल कोळसा खाण सुरू करण्यास भारतातील अदानी उद्योग समूहास आॅस्ट्रेलियाच्या सरकारने दिलेली पर्यावरण मंजुरी येथील संघीय न्यायालयाने रद्द केली आहे.
सागरी जीवसृष्टीच्या सर्वाधिक वैविध्यासाठी जगप्रसिद्ध असलेल्या ग्रेट बॅरियर रीफला लागून असलेल्या प्रदेशात अदानी ही खाण सुरू करणार होते. कोळसा खाण, तेथील कोळसा निर्यात करण्यासाठी स्वत:चे बंदर आणि त्याला जोडणारा रेल्वेमार्ग असा हा सुमारे १० अब्ज डॉलर प्रस्तावित गुंतवणुकीचा एकात्मिक प्रकल्प आहे. येथून वर्षाला ६० दशलक्ष टन कोळसा काढून तो भारतातील आपल्या औष्णिक वीज प्रकल्पांसाठी वापरण्याची अदानींची योजना आहे.
आॅस्ट्रेलियाचे पर्यावरणमंत्री ग्रेग हंट यांनी गेल्या जानेवारीत या प्रकल्पास पर्यावरण मंजुरी दिली होती. कोळसा खाणीतील उत्खनन, कोळशाची वाहतूक आणि एकूणच या महाकाय प्रकल्पामुळे होणाऱ्या वातावरण बदलामुळे ग्रेट बॅरियर रीफमधील सागरी वन्यजीवसृष्टीचे नाजूक संतुलन बिघडेल, या मुद्द्यावर स्थानिक लोकांनी वर्गणी काढून मॅकके कॉन्झर्वेशन ग्रुपतर्फे मंत्र्यांच्या निर्णयास आव्हान दिले होते. मंत्री हंट यांनी या कोळसा खाणीमुळे ग्रेट बॅरियर रीफमधील खास करून ‘याक्का स्किंक’ व ‘आॅर्नमेंटल स्नेक’ या विलुप्ततेच्या वाटेवर असलेल्या दोन सागरी जीवांवर होणाऱ्या विपरीत परिणामांचा साकल्याने विचार केलेला नाही, असे नमूद करून न्यायालयाने पर्यावरण मंजुरी रद्द केली.
आता पर्यावरण मंजुरीवर मंत्री फेरविचार करतील आणि नवा निर्णय सहा ते आठ आठवड्यांत अपेक्षित आहे, असे आॅस्ट्रेलिया सरकारच्या पर्यावरण मंत्रालयाने एका पत्रकात म्हटले.
सध्या मंजुरी नसल्याने कोळसा खाण सुरू होऊ शकत नाही, हे आमच्यासाठी महत्त्वाचे आहे. पुन्हा मंजुरी मिळू शकत असली तरी ती सहजपणे दिली जाऊ शकेल, असे नाही, असे न्यायालयात गेलेल्या पर्यावरणवाद्यांचे प्रवक्ते एलेन रॉबर्टस् म्हणाले. पर्यावरण मंत्रालयाने केलेल्या तांत्रिक कायदेशीर चुकीमुळे ही मंजुरी रद्द झाल्याचे अदानी उद्योग समूहाने त्यांच्या वेबसाईटवर म्हटले. त्रुटींची पूर्तता करून पुन्हा नक्की मंजुरी मिळेल, असा विश्वास व्यक्त करताना कंपनी म्हणते की, कायदा आणि नियमांचे कसोशीने पालन करीत पर्यावरणाची हानी न करता ही खाण चालविण्याचा आमचा स्वच्छ मानस आहे.
(वृत्तसंस्था)

Web Title: Adani's environmental clearance to Australia's coal mines canceled