नवी दिल्ली : केंद्रातील भाजपप्रणीत राष्ट्रीय लोकशाही आघाडी सरकारचे पहिल्या विदेश व्यापार धोरणात (एफटीपी-२०१५-२०) वस्तू आणि सेवा निर्यात व्यापार ९०० अब्ज अमेरिकन डॉलरपर्यंत नेण्याचे महत्त्वाकांक्षी उद्दिष्ट निश्चित करण्यात आले आहे. तसेच निर्यातदार आणि विशेष आर्थिक क्षेत्रासाठी प्रोत्साहनपर अनेक योजनाही घोषित करण्यात आल्या आहेत.
वाणिज्यमंत्री निर्मला सीतारामन यांनी विदेशी व्यापार धोरण जाहीर केले. वस्तू आणि सेवा व्यापार वाढविण्यासाठी ‘भारत वस्तू निर्यात योजना (एमईआयएस) आणि भारत सेवा निर्यात योजना (एसईआयएस) सुरू करण्यात येणार असल्याची घोषणाही त्यांनी यावेळी केली.
विदेश व्यापार धोरणाशिवाय कृषी उत्पादनाच्या निर्यातीसाठी उच्चस्तरीय प्रोत्साहन देण्यात येणार आहे. धोरणात सरकारच्या ‘मेक इन इंडिया’ आणि ‘डिजिटल इंडिया’ योजनांदरम्यान समन्वय राखण्यावरही भर देण्यात आला आहे. २०२० पर्यंत जागतिक व्यापारात भारत एक महत्त्वपूर्ण भागीदार होईल. तसेच विदेश व्यापार धोरण येणाऱ्या काळात भारताच्या जागतिक व्यापार वृद्धीला सहायक होईल, असा विश्वास निर्मला सीमारामन यांनी व्यक्त केला.