>ऑनलाइन लोकमत
नवी दिल्ली, दि. २९ - अंमलबजावणी संचालनालयाने तब्बल ९००३ कोटी रुपयांची संपत्ती गोठवली असून १७३ तक्रारी याप्रकऱणी दाखल केल्या आहेत.
आर्थिक वर्ष २०१३ -२०१४ च्या तुलनेत या वर्षी चारशे टक्के अधिक संपत्ती गोठवण्यात आली आहे. तसेच गेल्या आर्थिक वर्षाच्या तुलनेत आर्थिक गुन्हागारीमध्ये ५०० टक्के वाढ झाली आहे. तसेच पैशांची आफरातफऱ केल्याप्रकरणी ६०० टक्के अधिक आरोपींना अटक करण्यात आली आहे. तर एकुण खटल्यांमध्ये २०० टक्क्यांनी वाढ झाली असून फेरा, फेमा व प्रिव्हेन्शन ऑफ मनी लॉन्डरींग कायद्या अंतर्गत दाखल झालेल्या तक्रारीं वाढल्या आहेत.
काळे धन व हवाला मार्फत होणा-या पैशाच्या अफरातफरी बाबत वित्त मंत्रालय व अंमलबजावणी संचालनालयाच्या अहवालामध्ये ही माहिती देण्यात आली आहे. प्रिव्हन्शन ऑफ मनी लॉंडरींग अॅक्ट अंतर्गत ९००३ कोटी रुपयांची बेनामी संपत्ती जप्त करण्यात आली असून १३२६ जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तसेच या प्रकरणी ५२ जणांना अटकही करण्यात आली आहे. तसेच ३५५ जणांविरुद्ध या प्रकऱणी गुन्हा सिद्ध झाला आहे.