Lokmat Money > बिझनेस न्यूज > ३५ म्युच्युअल फंड योजना अपेक्षित

३५ म्युच्युअल फंड योजना अपेक्षित

भांडवली बाजारातील तेजीची स्थिती आणि त्यात सामान्य गुंतवणूकदारांचा वाढलेला लक्षणीय वावर विचारात घेत देशात कार्यरत असलेल्या ४४पैकी २३ म्युच्युअल फंड कंपन्यांनी

By admin | Updated: May 2, 2016 00:23 IST2016-05-02T00:23:28+5:302016-05-02T00:23:28+5:30

भांडवली बाजारातील तेजीची स्थिती आणि त्यात सामान्य गुंतवणूकदारांचा वाढलेला लक्षणीय वावर विचारात घेत देशात कार्यरत असलेल्या ४४पैकी २३ म्युच्युअल फंड कंपन्यांनी

35 mutual fund plans are expected | ३५ म्युच्युअल फंड योजना अपेक्षित

३५ म्युच्युअल फंड योजना अपेक्षित

- मनोज गडनीस,  मुंबई

भांडवली बाजारातील तेजीची स्थिती आणि त्यात सामान्य गुंतवणूकदारांचा वाढलेला लक्षणीय वावर विचारात घेत देशात कार्यरत असलेल्या ४४पैकी २३ म्युच्युअल फंड कंपन्यांनी नव्या ३५ योजना सुरू करण्याचे प्रस्ताव नियामक संस्था ‘सेबी’कडे दाखल केले आहेत. विशेष म्हणजे, यातील बहुतांश योजनांनी आखणी सामान्य गुंतवणूकदाराला डोळ्यांसमोर ठेवून करण्यात आली असून, मोठ्या शहरांच्या पलीकडे जात नागरी भागात व ग्रामीण भागात पोहोचण्यासाठी अनेक योजनांची नावेदेखील हिंदी भाषेत निश्चित केली आहेत.
उपलब्ध माहितीनुसार, सध्या कार्यरत फिक्स्ड इन्कम योजना आणि काही विमा योजना यांचा मिलाफ करत म्युच्युअल फंड कंपन्यांनी काही नव्या योजना सादर केल्या आहेत. यामध्ये मुलांच्या भविष्यासाठी बाल विकास योजना, बचत योजना, निवेश लक्ष्य, कर बचत योजना.. अशा काही योजना आहेत. या योजनांची बांधणी ही सामान्य गुंतवणूकदाराच्या विविध गरजा लक्षात घेत करण्यात आली असून, त्याच्या आयुष्यातील महत्त्वाच्या टप्प्यावर त्याला त्याचे स्वत:चे मुबलक संचित मिळेल, याचाही विचार या योजनांतून करण्यात आला आहे. विशेष म्हणजे, यातील बहुतांश योजनांमध्ये गुंतवणूक करणाऱ्या सामान्य ग्राहकांना कर बचतीचाही लाभ मिळणार आहे. आगामी महिनाभराच्या काळात ‘सेबी’कडून मंजुरी मिळाल्यावर या नव्या योजना टप्प्याटप्प्याने बाजारात येणे अपेक्षित आहे. गेल्या काही वर्षांपासून फिक्स्ड् इन्कम श्रेणीतील योजनांवरील (पोस्ट आॅफिस, मुदत ठेव, पीपीएफ, राष्ट्रीय बचत प्रमाणपत्र) व्याजदरात लक्षणीय घट झाल्यानंतर सामान्य गुंतवणूकदारांनी उत्तम परताव्यासाठी आणि तुलनेने कमी जोखमीच्या अशा मुच्युअल फंडाचा मार्ग स्वीकारला आहे. गेल्या पाच वर्षांत म्युच्युअल फंडात गुंतवणूक करण्याऱ्या परदेशी वित्तीय संस्था, देशी वित्तीय संस्था, हाय नेटवर्थ इन्डिव्हीज्युअल यांच्यासोबतच गुंतवणूकदारांत सामान्य गुंतवणूकदारांची टक्केवारी लक्षणीय वाढली आहे. तसेच, म्युच्युअल फंडांसंदर्भात जसजशी जागरूकता वाढत आहे, तसतशी महिन्याकाठी हजारो लोक या योजनांचा लाभ घेत आहेत.

योजनांची नावे हिंदीतून
गेल्या पाच वर्षांपासून म्युच्युअल फंडाच्या योजनांची लोकप्रियता वाढत असली तरी मेट्रोशहर, प्रथम श्रेणी आणि काही प्रमाणात द्वितीय श्रेणीतील शहरांतूनच याची ग्राहकसंख्या मर्यादित आहे. त्यामुळे याचा सर्व प्रकारच्या ग्राहकांत प्रसार करण्यासाठी आता अनेक कंपन्यांनी आपल्या नव्या योजनांची नावे हिंदी भाषेतून ठेवण्याचा निर्णय घेतला आहे. तसेच, त्या योजनांचे सर्व तपशीलही हिंदी व स्थानिक भाषेतून प्रसिद्ध करण्याचे काम सुरू केले आहे.
भांडवली बाजाराच्या नियमांनुसार, म्युच्युअल फंडांना त्यांच्या निव्वळ नफ्याच्या ०.०१ टक्का रक्कम ही आर्थिक साक्षरतेसाठी खर्च करणे बंधनकारक आहे. हे लक्षात घेता एका आर्थिक वर्षात कंपन्यांकडून सुमारे १५० कोटींचा निधी संकलित होतो. त्याचाही वापर मोठ्या प्रमाणावर आर्थिक प्रसारासाठी सुरू आहे.

४ कोटी सामान्य गुंतवणूकदार
म्युच्युअल फंड योजनांतील सामान्य गुंतवणूकदारांचे प्रमाण हे सुमारे
२२ टक्के असून, आकड्यांत ही संख्या ४ कोटी
५४ लाख इतकी आहे. गेल्या आर्थिक वर्षात यामध्ये ५४ लाख २२ हजार नव्या गुंतवणूकदारांची भर पडली आहे.

Web Title: 35 mutual fund plans are expected

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.