लोकमत न्यूज नेटवर्क, नवी दिल्ली : यूनिफाईड पेमेंट इंटरफेस अर्थात यूपीआयने जानेवारी ते नोव्हेंबर २०२४ पर्यंत तब्बल २२३ लाख कोटी रुपयांचे व्यवहार करण्यात आले आहेत. या माध्यमातून झालेल्या आर्थिक व्यवहारांची संख्या १५,५४७ इतकी होती. अर्थ मंत्रालयातून देण्यात आलेल्या आकडेवारीतून हे समोर आले आहे.
नॅशनल पेमेंट कॉर्पोरेशनने ही सेवा २०१६ मध्ये सुरु केली होती. चहाविक्रेते, लहान दुकानदार, फळे तसेच भाजी विक्रेते यांच्यापासून मोठे मॉल, हॉटेल्स, कपड्यांच्या दुकानांमध्ये याचा मोठ्या प्रमाणात वापर सुरु झाला आहे. कोविड महामारीच्या कालखंडात या सेवेचा वापर वेगाने वाढल्याचे दिसून आले. यामुळे देशातील डिजिटल पेमेंट व्यवस्थेत क्रांतीकारक बदल झाले आहेत. नागरिकांनी सोबत रोकड बाळगण्याचे प्रमाण कमी झाले आहे.
महिनाभरात झाले १६.५८ अब्ज व्यवहार
ऑक्टोबर २०२४ मध्ये यूपीआयच्या माध्यमातून १६.५८ अब्ज आर्थिक देवाणघेवाणीचे व्यवहार झाले. २०२३ मध्ये याच महिन्यात यूपीआयच्या माध्यमातून ११.४० अब्ज व्यवहार झाले होते. वर्षभरात यात तब्बल ४५ टक्के वाढ झाली आहे. यूपीआय पेमेंट सेवेसोबत देशभरातली ६३२ बँका जोडल्या गेलेल्या आहेत.