मागील महिनाभरापासून दडी मारून बसलेल्या पावसाचे अहिल्यानगर शहरासह तीन-चार दिवसांपासून पुनरागमन झाले आहे.
जिल्ह्यातील भागात हलक्या ते मध्यम स्वरूपाचा पाऊस झाल्याने अडचणीत सापडलेल्या खरीप हंगामाला दिलासा मिळाला आहे.
रविवारसह सोमवारी काही तालुक्यांत रिमझिम तर काही ठिकाणी जोरदार पावसाने हजेरी लावली असून, १३ ऑगस्टला हलका-मध्यम तर १४, १५ ऑगस्ट रोजी यलो अलर्ट हवामान विभागाने जारी केला आहे.
यंदा जिल्ह्यात जून, जुलै महिन्यांत केवळ १६ दिवस पाऊस झाल्याची नोंद असून, सरासरी ४० टक्के पावसाची तूट आहे. ऑगस्टच्या पहिल्या आठवड्यात रिमझिम पावसाला सुरुवात झाली आहे.
जून महिन्यात पडणाऱ्या पावसाची सरासरी १०८ मिमी असताना प्रत्यक्षात ७४ मिमी पाऊस झाला आहे. तर जुलै महिन्यात पावसाची सरासरी ९७.५ मिमी असताना केवळ ६१ मिमी पाऊस झाला आहे.
जिल्ह्यात ऑगस्ट महिन्यात आतापर्यंत २८.४ मिमी पावसाची नोंद झाली आहे. तर रविवारी ६.१ मिमी पाऊस झाला आहे.
सर्वाधिक ३१.४ मिमी पाऊस कर्जत तालुक्यात झाला आहे. पावसाअभावी अनेक ठिकाणी पिकांची वाढ खुंटली असून, पिकांवर विविध रोगाचा प्रादुर्भाव दिसत आहे.
अधिक वाचा: Dudh Anudan : दूध अनुदान योजनेचे आकडेवारी आली; राज्यात 'या' जिल्ह्याला सर्वाधिक अनुदान