Join us

निम्न दुधना प्रकल्पात यंदा मागील वर्षीच्या तुलनेत चारपट पाणीसाठा; 'या' तारखेला होणार कालव्यातून विसर्ग

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 25, 2025 17:29 IST

Nimna Dudhna Water Update : परतूर तालुक्यातील निम्न दुधना प्रकल्पातील जलसाठा यंदा समाधानकारक पातळीवर पोहोचला असून, सध्या प्रकल्पात ७२.५९ टक्के इतका जिवंत पाणीसाठा उपलब्ध आहे.

अशोक साकळकर 

जालना जिल्ह्याच्या परतूर तालुक्यातील निम्न दुधना प्रकल्पातील जलसाठा यंदा समाधानकारक पातळीवर पोहोचला असून, सध्या प्रकल्पात ७२.५९ टक्के इतका जिवंत पाणीसाठा उपलब्ध आहे.

२४ ऑगस्ट रोजी सायंकाळी ६ वाजेपर्यंत पाणीपातळी ४२५.०८० मीटर इतकी नोंदवली गेली. एकूण जलसाठा २७८.४२३ दशलक्ष घनमीटर (दलघमी) असून, ही पातळी प्रकल्पाच्या एकूण क्षमतेच्या ३४४.८०० दलघमी तुलनेत समाधानकारक मानली जात आहे.

सध्या प्रकल्पातील जिवंत पाणीसाठा १७५.८२३ दलघमी आहे. याच तारखेला मागील वर्षी फक्त ३७.०६५ दलघमी म्हणजेच १५.३० टक्के पाणीसाठा होता. यंदा झालेल्या पावसामुळे जलसाठ्यात चारपट वाढ झाली असून, खरीप हंगामासाठी पुरेसा साठा उपलब्ध राहील, अशी माहिती प्रकल्प अधिकाऱ्यांनी दिली.

सध्या डावा आणि उजवा कालवा तसेच सांडव्यातून कोणताही विसर्ग सुरू नाही. मात्र, दि. १५ ते २८ एप्रिल या कालावधीत डाव्या कालव्यातून २.९५० दलघमी व उजव्या कालव्यामधून १.९९१ दलघमी इतका पाणीपुरवठा करण्यात आला होता.

खरीप हंगामासाठी दिलासा

बिगर सिंचन पाणीवापर ०.०३१० दलघमी झाला आहे. यंदा १ जूनपासून सांडव्यातून पाण्याचा विसर्ग झालेला नसला, तरी आजवरच्या हंगामात एकूण २३.९३० दलघमी पाणी सांडव्यातून सोडले आहे. सध्या उपलब्ध जलसाठा शेतकरी व नागरिकांसाठी दिलासादायक असून, खरीप हंगामाला दिलासा देणारा ठरत आहे. त्यामुळे शेतकऱ्यांतून समाधान व्यक्त केले जात आहे.

मागील २४ तासांत सरासरी आवक दर ३७५ क्यूसेक्स

यंदा १ जूनपासून प्रकल्पात एकूण १२८.०२६ दलघमी आवक झाली असून, मागील २४ तासांत सरासरी आवक दर ३७५ क्यूसेक्स इतकी नोंदविली गेली आहे. रविवारी ०.१० एमसीएम इतके बाष्पीभवन व इतर व्यय नोंदविला गेला. दरम्यान, हा पाणीसाठा वाढल्यानंतर धरणातून खाली पाणी सोडले जाईल.

सध्या प्रकल्पात येणाऱ्या पाण्याची आवक कमी आहे. प्रकल्प ७२.५९ टक्के भरला असून, ७५% जलसाठा पूर्ण होण्यासाठी केवळ २.४१ टक्के बाकी आहे. आगामी दिवसांत पाणलोट क्षेत्रातून पाणी आवक झाल्यास, प्रकल्प पूर्ण भरल्यावर वरिष्ठांच्या आदेशानुसार पाणी तातडीने सोडण्यात येईल. - मुंजा कोल्हे, सहाय्यक अभियंता, सेलू.

५२४ मिमी पावसाची नोंद आजपर्यंत

यंदा १ जूनपासून आजपर्यंत प्रकल्प क्षेत्रात ५२४ मिमी पावसाची नोंद झाली आहे, तर मागील वर्षी याच कालावधीत ५८१ मिमी पर्जन्यमान झाले होते. गेल्या २४ तासांत मात्र पर्जन्यमानाची नोंद शून्य मिमी इतकी आहे.

हेही वाचा : शेतकऱ्याचा मुलाने उभारला कोट्यवधींचा उद्योग; प्रसंगी आईचं मंगळसूत्र गहाण ठेवलेल्या तरुणाची वाचा यशोगाथा

टॅग्स :जालनामराठवाडाधरणनदीपाणीगोदावरीशेती क्षेत्रशेतकरी