वाढत्या तापमानामुळे पाण्याची पातळी घटली आहे. बोअरवेल, विहिरी कोरड्या पडत असल्याने पिण्याच्या पाण्याची मागणी वाढली आहे. ही वाढती मागणी लक्षात घेत नाशिक जिल्ह्याच्या कसमादे परिसरातील पिण्याच्या पाण्याचा प्रश्न सोडवण्यासाठी आमदार नितीन पवार यांनी जिल्हाधिकाऱ्यांकडे पाणी सोडण्याची मागणी केली होती.
या मागणीची दखल घेत जिल्हाधिकाऱ्यांच्या आदेशान्वये पुनद धरणातून नदीपात्रात १००० क्युसेकने पाणी आवर्तन सोडले असून, १५ दिवसांत ७५० दशलक्ष घनफूट पाणी देण्यात येणार आहे.
चणकापूर धरणातून गिरणा नदीपात्रात ५०० क्युसेकने आठ दिवसांसाठी १४५ दशलक्ष घनफूट पाणी सोडण्यात येणार आहे. या आवर्तनामुळे पुनद व गिरणा नदीकाठावरील कळवण, देवळा, सटाण्यासह मालेगाव तालुक्याचा पिण्याच्या पाण्याचा प्रश्न मार्गी लागणार आहे.
जिल्हाधिकाऱ्यांच्या आदेशान्वये पुनद धरणातून नदीपात्रात १००० क्युसेकने ७५० दशलक्ष घनफूट पाणी सोडण्यात येणार असून, हे आवर्तन १५ दिवसांपर्यंत सुरू राहणार आहे.
तर चणकापूर धरणात शिल्लक असलेल्या ११३० दशलक्ष घनफूट साठ्चापैकी या आवर्तनाच्या माध्यमातून गिरणा नदीपात्रात ५०० क्युसेकने १४५ दशलक्ष घनफूट पाणी सोडण्यात येणार आहे व हे पाणी आठ दिवस सुरू राहणार आहे.
चणकापूर उजव्या कालव्याला लवकरच पाणी
कळवण तालुक्यातील काही गावे व देवळा तालुक्यातील काही गावांना चणकापूर उजव्या कालव्यामार्गे पिण्याचे पाणी देण्यात येत आहे. येत्या आठ दिवसांत चणकापूर उजव्या कालव्याला पाणी सोडून रामेश्वर धरण भरण्याचे पाटबंधारे विभागाचे नियोजन झाले असून, ३०० दशलक्ष घनफूट पाणी उजव्या कालव्याद्वारे सोडण्यात येणार आहे.
पुनदच्या आवर्तनाने भादवण, विसापूर, बिजोरे, चाचेर, पिळकोस, ककाणे, मोकभणगी, गणोरे, देसराणे, सिद्धेश्वर, जयदर, काठरा, कोसवन, मैताने, बंधारपाडा, मळगाव, खळजी या २० गावांचा पुढील महिनाभरासाठीचा पाणीप्रश्न सुटणार आहे.
तर चणकापूरच्या आवर्तनाने कळवण तालुक्यातील चणकापूर, अभोणा, पाळे खुर्द, कळमथे, पाळे बुद्रुक, दह्याणे, हिंगळवाडी, मानूर, एकलहरे, कळवण, नाकोडा, नवी बेज, जुनी बेज, पाटविहीर, पिळकोस, बगड्डू, सावकी, गोसराणे, भेंडी, निवाणे, खेडगाव या २१ गावांमधील पुढील महिनाभरासाठीचा पाणीप्रश्न सुटणार आहे.
पुनद (अर्जुनसागर) धरणातून कसमादेसाठी पाणी सोडण्यात आले असून, १५ दिवस हे आवर्तन सुरू राहणार आहे. त्याशिवाय चणकापूरमधून पाणी सोडण्यात आले आहे. नागरिकांनी सहकार्य करावे व पाण्याचा जपून वापर करावा. अवैध वीजपंप आढळल्यास कारवाई करण्यात येईल. - रोहित पवार, सहायक अभियंता, पाटबंधारे विभाग, कळवण.
नदी काठावरील गावांमध्ये भारनियमन
• देवळा, सटाणा, मालेगाव या तालुक्यांमधील ५० गावांसह कसमादेच्या २१ गावांचा पाणीप्रश्न सुटणार आहे. यामुळे नागरिकांनी समाधान व्यक्त केले आहे. शिवाय दोन्ही धरणांतील उर्वरित पाणीसाठा अडचणीच्या व आणीबाणीच्या काळात राखून ठेवण्यात येणार आहे.
• आवर्तन सुरू असेपर्यंत शेतकऱ्यांना वीजपंपांसाठी वीज मिळण्याकरिता तासनतास प्रतीक्षा करावी लागणार आहे.
• अवैध वीजपंप चालवून कुणी पाणीउपसा करू नये, यासाठी वीज काही काळ बंद करण्यात येणार आहे. तसेच नदीकाठावर पाटबंधारे विभागाचे कर्मचारी व गरज भासल्यास पोलिस रात्रंदिवस पहारा देणार आहेत. नदीकाठच्या या गावांमध्ये ४ ते ८ तास भारनियमन करण्यात येणार आहे.
असे सुरू राहणार आवर्तन
• ७५० दलघफू पाणी पुनदमधून सोडणार.
• १५ दिवस सुरू राहणार आवर्तन.
• १४५ दलघफू पाणी चणकापूर धरणामधून सोडणार.
• ८ दिवस सुरू राहणार आवर्तन.
