Join us

जनाई शिरसाई उपसा सिंचन योजनेचे पाणी आता बंदिस्त नलिकेतून; ४३८ कोटींच्या खर्चास मान्यता

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 12, 2025 17:59 IST

janai shirsai lift irrigation पुणे जिल्ह्यातील जनाई शिरसाई उपसा सिंचन योजनेचे पाणी बंदिस्त नलिका वितरण प्रणालीद्वारे, ४३८ कोटींच्या खर्चास मान्यता देण्यात आली आहे. याबाबतचा निर्णय मंगळवारी (दि ११) झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीत घेण्यात आला.

पुणे/बारामती : पुणे जिल्ह्यातील जनाई शिरसाई उपसा सिंचन योजनेचे पाणी बंदिस्त नलिका वितरण प्रणालीद्वारे, ४३८ कोटींच्या खर्चास मान्यता देण्यात आली आहे. याबाबतचा निर्णय मंगळवारी (दि ११) झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीत घेण्यात आला.

बैठकीच्या अध्यक्षस्थानी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस होते. या निर्णयामुळे बारामती तालुक्यातील जिरायती भागाचा पाणीप्रश्न सुटण्यासाठी महत्त्वाचे पाऊल पडल्याचे मानले जाते.

या योजनेमुळे दौंड, बारामती व पुरंदर तालुक्यातील एकूण १४ हजार ८० हेक्टर क्षेत्र सिंचनाखाली येणार आहे. उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या सातत्यपूर्ण पाठपुराव्यामुळे योजनेसाठी ही मान्यता मिळाली आहे.

या महाराष्ट्र कृष्णा खोरे विकास महामंडळाची ही जनाई शिरसाई उपसा सिंचन योजना अवर्षणग्रस्त क्षेत्रात आहे. या योजनेस खडकवासला प्रकल्पातून पाणी मिळते.

या योजनेतील कालवे उघड्या पद्धतीचे आहेत. डोंगराळ भागातील मुरमाड जमिनीमुळे कालव्यांमधून पाणी गळती मोठी होते. कालव्यांची कामे २५ वर्ष जुनी आहेत. पाणी उपलब्ध न झाल्यामुळे कालव्यांचे नुकसान झाले आहे.

ही योजना पूर्ण क्षमतेने कार्यान्वित न झाल्याने या परिसरातील ४० हून अधिक गावांना टंचाईचा सामना करावा लागतो. त्यामुळे शेतकरी व स्थानिक लोकप्रतिनिधींनी बंदिस्त नलिका वितरण प्रणालीद्वारे या योजनेतून पाणी मिळावी अशी मागणी केली होती.

मूळ नियोजनानुसार कालवे व वितरण व्यवस्थेकरिता ४१५.५०५ हेक्टर भूसंपादन करावी लागणार होती. आता बंदिस्त नलिका वितरण प्रणालीमुळे भूसंपादनाची आवश्यकता राहणार नाही. तसेच बाष्पीभवन व गळतीमुळे वाया जाणाऱ्या १.०६ टीएमसी पाण्याची बचत होणार आहे.

जनाई उपसा सिंचन योजनेतून दौंड, बारामती, पुरंदर तालुक्यातील ८ हजार ३५० हेक्टरला व शिरसाई योजनेतून बारामती, पुरंदरच्या ५ हजार ७३० हेक्टरला सिंचनासाठी पाणी उपलब्ध होणार आहे.

शिरसाई उपसा सिंचन योजनेंतर्गत नवीन मुठा उजव्या कालव्याद्वारे १३८ किमी अंतरावर शिर्सुफळ तलावात पाणी सोडले जाते. तेथून उपसा करून ५ हजार ७३० हेक्टर क्षेत्र सिंचनाखाली येणार आहे.

या योजनेत ४७ तलावांचा समावेश आहे, त्यापैकी ३२ तलाव पाण्याने भरले जात आहेत. नलिका प्रणालीमुळे भूसंपादनाची गरज राहत नाही. तसेच मशागतीस कोणताही अडथळा येत नाही. नलिका वितरणाद्वारे समन्यायी पाण्याचे वाटप करणे सुलभ होते.

नलिका वितरण प्रणालीचा देखभाल दुरुस्ती व परिचलनाचा खर्चही तुलनेने कमी राहतो. डोंगर उतारावरील, खोल खोदाईतील व काळ्या मातीतील कालव्यांवर तुलनेने देखभाल-दुरूस्तीचा खर्च जास्त राहतो. खडकवासला प्रकल्पातून सदर योजनेस पाणी मिळते.

पाण्याचा कार्यक्षम वापरशिरसाई उपसा सिंचन योजना बंदिस्त नलिकेमध्ये रूपांतरित केल्याने पाण्याचा कार्यक्षम वापर होणार आहे. तसेच पाण्याची बचत होऊन पुणे महानगरपालिकेला पाणी पुरवठ्यामुळे खडकवासला प्रकल्पावरील येणारा ताण कमी होणार आहे.

टॅग्स :पाटबंधारे प्रकल्पराज्य सरकारसरकारपाणीबारामतीपुणेदेवेंद्र फडणवीसदुष्काळशेतकरीशेतीपीक