अकोला : बहुप्रतिक्षीत पूर्णा-२ बॅरेजचे (नेरधामणा) बांधकाम पूर्ण झाले आहे. सध्या पंप हाउसचे काम सुरू आहे. हे काम झाल्यांनतर खारपाणपट्ट्यातील अकोला, तेल्हारा व बाळापूर तालुक्यांतील शेतकऱ्यांना सिंचनासाठी पाणी (Water for Irrigation) मिळणार आहे.
जिल्ह्यात खारपाणपट्ट्यात बॅरेजची श्रृखंला तयार करण्यात आली असून, नेरधामणा, उमा, काटेपूर्णा या प्रकल्पांची कामे झाली आहेत. किरकोळ कामे आता शिल्लक आहेत. (Water for Irrigation)
नेरधामणा बॅरेजचे काम २०२२-२३ मध्येच पूर्ण झाले असून, मागील दोन पावसाळ्यांत या बॅरेजमध्ये पाणी साठवणही करण्यात आली आहे. परंतु, शासनाने कालव्याऐवजी आता भूमिगत (पीडीएन) जलवाहिनीद्वारे पाणी सोडण्याची योजना सुरू केली आहे. यामुळे पाण्याचे नुकसान टळणार आहे. याकरिता येथे पंप हाऊसचे काम करणे क्रमप्राप्त होते, परंतु सातत्याने विलंब होत गेला होता. (Water for Irrigation)
आता पंप हाऊसच्या कामाला सुरुवात झाली आहे. पीडीएनचेही काम सुरू करण्यात येणार आहे. ही कामे दोन वर्षात पूर्ण होणार असल्याचा दावा जलसंपदा विभागाने केला आहे. (Water for Irrigation)
८ दक्षलक्ष घनमीटर पाणी साठवण क्षमता
नेरधामणा प्रकल्पात ८ दलघम पाणीसाठवण क्षमता असून, यातील १५ टक्के पाणी पिण्यासाठी आरक्षित आहे. दरम्यान, शेतकऱ्यांना आता पीडीएन आणि पंप हाऊसचे काम पूर्ण होण्याची प्रतीक्षा आहे.
उमा बॅरेजचे काम सुरू
मूर्तीजापूर तालुक्यातील उमा बॅरेजचे रखडलेले कामही सुरू करण्यात आले आहे. यामुळे श्रृंखलेतील बॅरेजचे कामही लवकरच होणार आहे.
कवठा शेलूचे क्षमापण
कवठा शेलू बॅरेजचे काम २०१२-१३ मध्ये निकृष्ठ कामामुळे बंद करण्यात आले होते. हे काम सुरू व्हावे, यासाठी शासनाकडे क्षमापण प्रस्ताव जलसंपदा विभागाने पाठविला आहे.
शहापूरला 'पीडीएन' होणार
शहापूर बृहत प्रकल्पाचे भूमिगत जलवाहिनी टाकण्याचे काम जवळपास पूर्ण होत आले आहे. या कामावर १५.०६ कोटी रुपये खर्च करण्यात आला आहे. हे काम पूर्ण झाल्यानंतर जिल्ह्यातील हा पहिला भूमिगत जलवाहिनीद्वारे सिंचनासाठी पाणी देणारा प्रकल्प असेल.
'काटीपाटी'चे काम सुरू
काटीपाटी बॅरेजचे कामही सुरू झाले आहे. या बॅरेजचे काम लवकरच झाल्यास अकोला तालुक्यातील सिंचन क्षेत्रात भर पडणार आहे.