छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात हवामानाने अचानक घेतलेल्या कलाटणीमुळे बळीराजा पुन्हा एकदा संकटात सापडला आहे. मंगळवारी (दि. १३) सायंकाळच्या सुमारास गंगापूर आणि पैठण तालुक्यात अवकाळी पावसाने जोरदार हजेरी लावली, तर सिल्लोडच्या भवन परिसरात दिवसभर ढगाळ वातावरण राहिल्याने रब्बी पिकांसह फळबागांवर संकट घोंगावत आहे.
गंगापूर शहर आणि परिसरात मंगळवारी सायंकाळी ६ वाजेच्या सुमारास अर्धा तास जोरदार पाऊस झाला. या पावसामुळे ऐन भरात असलेली रब्बीची पिके धोक्यात आली असून काही ठिकाणी काढून ठेवलेला मका पूर्णपणे भिजला आहे.
सप्टेंबर-६ ऑक्टोबरमधील परतीच्या पावसाने नुकसान खरिपाचे केल्यानंतर आता या जानेवारीतील अवकाळीने शेतकऱ्यांच्या तोंडचा घास हिरावला आहे. पावसामुळे शहरासह ग्रामीण भागाचा वीजपुरवठा खंडित झाल्याने नागरिकांना अंधारात राहावे लागले.
पैठणमध्ये फळबागांचे गणित बिघडले
• पैठण तालुक्यातील ढोरकीन, रांजणगाव खुरी व कडेठाण शिवारात सायंकाळी साडेसातच्या सुमारास पावसाने दाणादाण उडवली. काढणीला आलेली तूर, गहू, हरभरा आणि कांदा पिकांचे यामुळे मोठे नुकसान झाले आहे.
• विशेषतः मोसंबी आणि डाळिंबाच्या बागांना पाण्यासाठी 'ताण' दिला असतानाच पाऊस झाल्याने फळबागांचे चक्र बिघडले आहे. आंब्याचा मोहर गळण्याची शक्यता निर्माण झाल्याने फळ उत्पादक शेतकरी हवालदिल झाला आहे.
• खते आणि मजुरीच्या वाढत्या खर्चाने कोलमडलेला शेतकरी आता हतबल झाला आहे. प्रशासनाने या नुकसानीचे वस्तुनिष्ठ पंचनामे करून तातडीने आर्थिक भरपाई द्यावी, अशी मागणी शेतकरी वर्गातून केली जात आहे.
