राज्यभरातील अवकाळी पावसाचा जोरही पुढील तीन दिवस कायम राहणार आहे. ठिकठिकाणी पडलेल्या पावसामुळे राज्यभरातील किमान तापमानाचा पाराही घसरला आहे.
पुढील ३ दिवस काही ठिकाणी पावसाचा अंदाज आहे. तर मराठवाड्यातील छत्रपती संभाजीनगर, जालना, परभणी, हिंगोली, बीड, धाराशिव, नांदेड आणि लातूर जिल्ह्यातही पुढील ४ दिवस काही ठिकाणी वादळी पावसाचा इशारा देण्यात आला.
मध्य महाराष्ट्रातील पुणे, सातारा, सांगली, सोलापूर, कोल्हापूर आणि अहिल्यानगर तसेच नाशिक जिल्ह्यातही पावसाला पोषक हवामान आहे.
हवामान विभागाने पुढील ३ दिवस विदर्भातील बुलडाणा, अकोला, अमरावती, वाशीम, यवतमाळ, वर्धा, नागपूर, चंद्रपूर, भंडारा, गोंदीया आणि गडचिरोली जिल्ह्यात काही ठिकाणी विजा आणि ढगांच्या गडगडाटासह वादळी पावसाचा इशारा हवामान विभागाने दिला.
उत्तर महाराष्ट्र, कोकण ते अरबी समुद्रापर्यंत हवेचा कमी दाबाचा पट्टा सक्रिय आहे. गेल्या दोन दिवसांत मुंबईत वादळी वाऱ्यासह पाऊस झाला, त्यामुळे पश्चिम रेल्वे दोन वेळा बंद पडली. या पावसामुळे मुंबईच्या किमान तापमानाचा पारा उतरला आहे.
रात्री गार वारे वाहत असून, दिवसाही मळभ असल्याने उन्हाचे चटके कमी झाले आहेत. गुरुवारीही सकाळपासून मुंबईवर पावसाचे ढग जमा झाले होते. पश्चिम उपनगरात दुपारपर्यंत ठिकठिकाणी पावसाने हजेरी लावली.
अधिक वाचा: ई-मोजणी 'व्हर्जन २' मुळे राज्यात जमीन मोजण्या होतायत वेगात; शिल्लक मोजण्या लवकरच होणार