पंढरपूर : उजनी व वीर धरणाच्या पाणलोट क्षेत्रामधील सततच्या पावसामुळे धरणाच्या पाणीपातळीमध्ये सातत्याने वाढ होत आहे.
बुधवार रात्री ९ वाजता उजनीतून भीमा नदीत १ लाख २६ हजार ६०० क्युसेक विसर्ग सोडण्यात येत आहे, तर वीर धरणातून नीरा नदीपात्रातून ४६ हजार १२१ क्युसेक इतका विसर्ग सुरू आहे.
उजनी व वीर मिळून एकत्रित १ लाख ७२ हजार ७२१ क्युसेक विसर्ग भीमा नदीमध्ये येत आहे. त्यामुळे भीमा नदी दुथडी भरून वाहत असून पंढरपुरात पूरसदृश स्थिती निर्माण झाली आहे.
पुराचे हे पाणी पंढरपुरातील व्यासनारायण झोपडपट्टीत शिरणार आहे. संगम येथे १ लाख २५ हजार ७८९ क्युसेक इतका विसर्ग सुरू आहे. तर पंढरपूर येथे रात्री ८ वाजता ७४ हजार ७०० क्युसेकचा विसर्ग सुरू आहे.
पुराच्या पाण्यामुळे भीमा नदीवर असलेले तालुक्यातील करोळे, आव्हे, पटवर्धन कुरोली, गुरसाळे, पंढरपूर, अजनसोंड, पुळूज आदी बंधारे पाण्याखाली गेले आहेत.
याशिवाय जुना दगडी पूल, जुन्या पालखी मार्गावरील शेळवे ओढ्यातील पुलावर पाणी आहे. त्यामुळे तेथील वाहतूक बंद करण्यात आली आहे.
अधिक वाचा: विस्माने 'हा' कारखाना ठरवला राज्यातील सर्वोत्कृष्ट साखर कारखाना; आज पुरस्कार वितरण